Phaltan Accident – आळंदी ते पंढरपूर महामार्गावर विवाहासाठी जाणाऱ्या दाम्पत्याला बरड (घोलपवस्ती, ता. फलटण) येथील घोलप कृषी फार्मशेजारी समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. विडणी येथे झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच मंगळवारी हा अपघात घडल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळ व फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता. फलटण) येथील गजानन रामचंद्र जाधव (वय ५७) व सिंधुताई गजानन जाधव (वय ५३) हे दाम्पत्य विवाह कार्यक्रमासाठी राजुरी येथून फलटणच्या दिशेने मोटार सायकलवरून (एमएच ०२- व्ही ४१०९) निघाले होते. फलटणच्या उलट्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच ११ सीएच ६१८६) मोटार सायकलला जोरदार टक्कर दिल्याने गजानन जाधव व सिंधुताई जाधव या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मृत दांपत्याचा मुलगा सचिन गजानन जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिली. बरड पोलीस दूरक्षेत्रचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य विभागाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली. तातडीने दोन्हीही मृतदेह फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना देण्यात आले. ट्रक चालक प्रज्वल शिवाजी गायकवाड (वय 28, रा. कुमठे ता. कोरेगाव) याच्यावर सदोष मनुष्यवधाचा तसेच परिस्थितीचा विचार न करता विरुद्ध दिशेने वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याकारणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. विडणी येथील झालेल्या अपघातामध्ये एक युवक जागीच मृत्यूमुखी पडला. ही घटना ताजी असतानाच काल राजुरी येथील दाम्पत्याला जीव गमवावा लागला. बरड, विडणी, पिंपरद येथील मार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनत असताना याठिकाणी प्रशासनाने जागोजागी दिशादर्शक फलक, सूचनादर्शक फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे.