आदेश ढाब्यावर बसून पेट्रोल विक्री

तहसीदारांकडून पंप मालकाची धुलाई

श्रीगोंदा,  (प्रतिनिधी) – पेट्रोल वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी वेळ ठरवून दिले असतांनाही तो आदेश ढाब्यावर बसून सर्रास पेट्रोलची विक्री करणाऱ्या पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर तहसीलदारांनी छापा टाकून त्या पंप मालकाची चांगलीच धुलाई केली.

तहसीलदार महेंद्र महाजन यांनी यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. संचारबंदीचे आदेश असतानाही मोटारसायकलस्वारांना बेफिकीरपणे पेट्रोल वाटप करताना पकडले. या पंपाला 15 एप्रिलपर्यंत पंप सील ठोकण्यात आले आहे.

श्रीगोंदा तालुक्‍यात सुमारे 27 पेट्रोल पंप आहेत. हे पंप पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले. खासगी मोटारसायकल व चारचाकी वाहने, खासगी बसला पेट्रोल, डिझेल देऊ नये, असे लेखी आदेश दिले असताना पेट्रोल पंपाचे मालक नियमाचा भंग करीत आहेत. तहसीलदार महेंद्र महाजन यांनी गुरुवारी सकाळी श्रीगोंदा शहरातील चंद्रमा व कानन पेट्रोल पंपावर पाहणी केली. खासगी वाहनांना पेट्रोल डिझेल देऊ नये, अशी समज दिली. नंतर पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. येथील सावळागोंधळ पाहून पेट्रोल पंप मालकाची धुलाई केली.

काही जणांनी पेट्रोल ड्रममध्ये विक्रीसाठी चालविले होते.त्यांनाही बदडले. तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याबरोबर आरटीओचे पथक होते. या पथकाने मोकाट फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.