Petrol Diesel Shortage – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर इंधनाची टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेने नागरिक धास्तावले आहेत. यामुळे वाहनांची टाकी फुल्ल केली जात आहे, यातून अचानक वाढलेल्या मागणीमुळे पेट्रोल कंपनीच्या लोणी काळभोर येथील डेपोवर टँकर भरण्यासही वेळ लागत असल्याने पेट्रोल पंपावर टँकर पोहचण्यास विलंब होत आहे. यामुळे पंपावर रांगा लागत आहेत, पुरवठा विस्कळीत झाल्याने काही ठिकाणी पेट्रोल संपल्याचे फलकही दिसू लागले आहेत. पेट्रोल, डिझेल बाबत अफवा पसरत असल्याने वाहन चालक- मालक गाड्यांच्या टाक्या भरून ठेवत आहेत. एकाएकी गरजेपेक्षा अधिक पेट्रोल, डिझेलची खरेदी होत असल्यामुळे मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी पंप चालकांचीही मागणी वाढली आहे. डेपो येथेही गाड्या भरण्यास रांगा आहेत. तेथून गाडी भरून पोहचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भरलेली गाडी पंपावर पोहचेपर्यंत पंप बंद ठेवावा लागत आहे. काही पंपावर वाहनांच्या रांगा कायम आहेत. इंधन बचतीच्या आवाहानाचा प्रारंभीचा काळ असल्यामुळे ग्राहकांत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल पंप. हळुहळू गोंधळाची स्थिती निवळल्यानंतर पुन्हा वाढलेली मागणी घटेल. असा अंदाजही पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे पदाधिकारी व पंप चालक व्यक्त करत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार किंवा घट होणार याबाबत कोणताच अंदाज व्यक्त करता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पेट्रोल संपल्याचे फलक का ? इंधनाची टंचाई नाही. मात्र, शहरासह जिल्ह्यातून सर्वत्र एकदम मागणी वाढली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना गाड्या भरण्यास विलंब होत आहे. परिणामी भरलेली गाडी पंपावर पोहचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे काही वेळा पंप चालक इंधन संपल्याचे फलक लावत आहेत. अशा फलकामुळे वाहनचालकांत गोंधळ निर्माण होत आहे. टंचाईची कोणतीही स्थिती नसल्याने वाहनचालकांनी गोंधळू नये, असे आवाहन पेट्रोलियम कंपन्या व पंप चालकांनी केले आहे. “पंतप्रधानांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे लोकांनी गोंधळून जाऊ नये. आपल्या शहरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा किंवा टंचाई नाही. त्यामुळे ग्राहकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करू नये. जागतिक बाजारपेठेते इंधनाचे दर वाढल्यामुळे आपल्याकडेही वाढले आहेत.” – ध्रुव रूपारेल, अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल असोसिएशन.