पेट्रोल, डीझेलचे दर गगनाला; सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले

पिंपरी  – पेट्रोलच्या दरवाढीने सर्वसामान्यांना सध्या चांगलाच फटका बसत आहे. गेल्या महिनाभरात प्रति लिटरमागे 5 रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. स्पीड पेट्रोलचे प्रति लिटर दर शंभर रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहे. तर, साध्या पेट्रोलचे दर सध्या प्रति लिटर 97 रुपयांपर्यंत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये पेट्रोलचे दर बुधवारी (दि. 24) प्रति लिटर 97.02 रुपये इतके होते. आठवडाभरापूर्वी म्हणजेच 17 तारखेला हेच दर 95.69 रुपये प्रति लिटर इतके होते. प्रति लिटरमागे सध्या 1.33 रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच 24 जानेवारीला पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 92.01 रुपये इतके होते. म्हणजेच महिनाभरात पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

डीझेलमध्ये पावणेसहा रुपयांची वाढ
प्रति लिटर डीझेलचे दर बुधवारी (दि. 24) 86.87 रुपये इतके होते. आठवडाभरापूर्वी प्रति लिटर डीझेल 85.36 रुपयांना उपलब्ध होते. तर, महिनाभरापूर्वी म्हणजे 24 जानेवारीला डीझेलचे दर 81.16 रुपये प्रति लिटर इतके होते. महिनाभरात डीझेलच्या दरामध्ये जवळपास पावणेसहा रुपयांची वाढ झाली आहे. डीझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

पेट्रोलचे दर व्हावे कमी…
पेट्रोलच्या दरांमध्ये सध्या होणाऱ्या वाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पूर्वी 70 रुपये प्रति लिटरपर्यंत पेट्रोल मिळत होते. आता शंभरीपर्यंत पेट्रोल पोहचल्याने पेट्रोलवर दर महिन्याला कराव्या लागणाऱ्या खर्चात चांगलीच वाढ झाली आहे.

दिवसाला जर एखादी व्यक्ती एक लिटर पेट्रोल टाकत असेल तर त्याला प्रति लिटरसाठी पेट्रोलमधील 30 रुपयांच्या वाढीने 900 रुपये जादा मोजावे लागत आहेत. पेट्रोलचे दर नियंत्रणात ठेवून नागरिकांचे जगणे सुकर करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

स्पीडने गाठली शंभरी
स्पीड पेट्रोलचे दर बुधवारी 99.86 रुपये प्रति लिटर इतके होते. आठवडाभरापूर्वी म्हणजेच 17 तारखेला त्याचे दर प्रति लिटरसाठी 98.52 रुपये इतके होते. तर, महिनाभरापूर्वी 24 जानेवारीला 94.82 रुपये प्रति लिटर इतके दर होते. म्हणजेच महिनाभरात स्पीड पेट्रोलच्या प्रति लिटरच्या दरातही पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

“”पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायला हवे. त्यांच्या दरवाढीमुळे आपोआपच महागाई देखील वाढते आहे. सध्या शंभरीपर्यंत पेट्रोलचे दर पोहचल्याने त्याची नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.”
– अमोल दिवाण.

पेट्रोलसाठी दररोज कराव्या लागणाऱ्या खर्चात बरीच वाढ झाली आहे. सध्या पेट्रोलवर मला दिवसाला 300 रुपये खर्च करावे लागत आहेत. तुलनेत आर्थिक उत्पन्न मात्र वाढत नाही. सरकारने पेट्रोलच्या किमती नियंत्रणात ठेवायला हव्या.
– संजय चोडणकर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.