Petrol Diesel Prices Hike – पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती लक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोलियम उत्पादनांचा काळजीपूर्वक वापर करण्याचा सल्ला दिला होता. तसेच भविष्यात देशावर येणारे संकट टाळण्यासाठी सोने न खरेदी करण्याचे आवाहनही केले होते. त्यानंतर देशभरात त्यांची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, दुसरीकडे पेट्रोलच्या किंमतीत 3.14 रुपयांनी आणि डिझेलच्या किंमतीत 3.11 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच दिल्लीसह अन्य शहरांमध्ये सीएनजीच्या किमतीतही २ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. यामुळे अगोदरच गॅस दरवाढ आणि गॅसच्या पुरवठ्यातील अनियमिततेमुळे हैराण झालेल्या जनतेवर आणखी महागाईचे चटके सहन करावे लागणार आहे. देशभरात महागाईचा भडका उडाल्याचेही पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी कंपन्या तोट्यात चालल्या होत्या. ज्यामुळे आता कंपन्यांनी होणाऱ्या तोट्याची भरपाई करण्यासाठी दरवाढीचे पाऊल उचलले आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्ध सुरू होण्यापूर्वी क्रूड ऑइलचे दर 70 डॉलर होते, जे आता वाढून 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. ज्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. परंतु जर का कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये दीर्घकाळ वाढ कायम राहिली, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढवल्या जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, निवडणुका प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंधनाच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे.