Petrol diesel price – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत पुन्हा वाढ केली. त्यामुळे ती इंधने लिटरमागे प्रत्येकी ९० पैशांनी महागली. अवघ्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ झाली. त्या दोन दरवाढींमध्ये मिळून पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत ४ रूपयांची भर पडली. तेवढ्याने सार्वजनिक कंपन्यांना होणारा तोटा भरून निघणारा नाही. त्यामुळे पुढील काही दिवस इंधन दरांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, तणावपूर्ण स्थितीमुळे संपूर्ण जगासमोर इंधन संकट उभे ठाकले आहे. त्यातून जागतिक बाजारातील कच्च्या इंधनांचे दर वाढले आहेत. साहजिकच, भारतातील सर्वाजनिक कंपन्यांचा कच्च्या इंधन खरेदीवरील खर्च वाढला आहे. त्यातुलनेत कमी किमतीत पेट्रोल आणि डीझेलची विक्री केली जात असल्याने सार्वजनिक कंपन्यांचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढला. अखेरीस सार्वजनिक कंपन्यांनी ४ वर्षांच्या खंडानंतर दरवाढीचे पाऊल उचलले. त्यानुसार, १५ मे यादिवशी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत ३ रूपयांपेक्षा अधिक वाढ करण्यात आली. देशातील ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया आटोपल्यानंतर ते पाऊल उचलण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांत दुसरी दरवाढ झाली. पहिल्या दरवाढीनंतरही सार्वजनिक कंपन्यांना लिटरमागे पेट्र्रोलसाठी १० रूपये, तर डीझेलसाठी १३ रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. पहिल्या दरवाढीमुळे सार्वजनिक कंपन्यांचा दैनंदिन तोटा १ हजार कोटी रूपयांवरून कमी होऊन ७५० कोटी रूपये इतका झाला. मात्र, तो तोटा अद्यापही लक्षणीय स्वरूपातील आहे. त्यामुळे पुढील काळात जनसामान्यांवरील दरवाढीची टांगती तलवार कायम असेल. याआधी सीएनजीचे दरही तीन दिवसांत दोनवेळा वाढले. सीएनजीच्या दरात किलोमागे प्रथम २ रूपयांची आणि नंतर १ रूपयाची वाढ करण्यात आली.