हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतातच; पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा

नवी दिल्ली : देशात काही शहरात पेट्रोलच्या किंमती शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. देशातल्या विरोधी पक्षांनी यावरुन केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर बोलणं म्हणजे धर्मसंकट अस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीवर अबज दावा केला आहे.
हिवळ्यात पेट्रोल, डिझेलची मागणी वाढते, त्यामुळे किंमतीत वाढतातच. हिवाळा संपला की, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, असा अजब दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते एएनआयशी बोलत होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असल्याचा फटका ग्राहकांनाही बसला आहे. हिवाळा गेल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून, मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. थंडीत हे होत असतं, दर कमी होतील, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
याआधी अर्थमंत्री सीतारमण यांनी इंधन दरवाढीवर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या की, “या किंमती कधी कमी होणार त्यावर आताच काही सांगू शकत नाही. आता यावर काही भाष्य करणे म्हणजे धर्मसंकट आहे.” पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार जो भरमसाठ कर लावतो तो कधी कमी करणार या प्रश्नाला उत्तर देताना ‘या प्रश्नाने धर्म संकटात टाकलंय’ असे उत्तर निर्मला सीतारमण यांनी दिले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढण्याची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.




