Petrol Diesel Price: होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणखी एका निर्णयामुळे जागतिक तेलबाजारात खळबळ उडाली आहे. रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवरील तात्पुरती सूट वाढवण्यास ट्रम्प प्रशासनाने नकार दिल्याने जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांतील पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांच्या दरांवर होऊ शकतो. परिणामी महागाईचा दबावही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियन तेलावर कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, मार्च २०२६ मध्ये इराण संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे बाजारात तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून ट्रम्प प्रशासनाने काही अटींसह तात्पुरती सूट दिली होती. ही सूट १६ मेपर्यंत लागू होती आणि समुद्री टँकरमधील तेल वाहतुकीसाठीच मर्यादित होती. दरम्यान, युरोपीय देशांनी या सूटला तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या मते, रशियन तेल विक्रीतून मिळणारा निधी युद्धासाठी वापरला जात आहे. अखेर या दबावानंतर अमेरिकेने ही सूट रद्द करण्याचा निर्णय घेतला. Petrol Diesel Price: या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे भारताने रशियन तेलावर अवलंबित्व वाढवले होते. मार्च २०२६ मध्ये भारताने दररोज सुमारे ४.५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची आयात केली होती, त्यापैकी जवळपास ५० टक्के तेल रशियाकडून आले होते. त्याचवेळी मध्य पूर्वेकडून होणारा पुरवठा सुमारे ६१ टक्क्यांनी घटला होता. एप्रिल २०२६ मध्येही रशिया भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार राहिला. या महिन्यात भारताने रशियाकडून दररोज अंदाजे १.५७ दशलक्ष बॅरल तेल आयात केले. मात्र, ही आयात मार्चच्या तुलनेत जवळपास २० टक्क्यांनी कमी होती. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात तेलाच्या किमती सातत्याने वाढत राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढू शकतात. काही दिवसांपूर्वीच इंधनदरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. सीएनजीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.