नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शुक्रवारी पुन्हा प्रति लीटर 80 पैशांनी वाढ झाली करण्यात आली आहे. चार दिवसांतीलही सलग तिसरी वाढ आहे. 22 मार्चपासून तीन वाढीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकूण 2 रूपये 40 पैशांनी वाढल्या आहेत.
निवडणूक काळात 137 दिवस इंधनाची दरवाढ सरकारने रोखून धरली होती. आता इंधनदरवाढीचा लॉकडाऊन संपला असल्याने इंधनाच्या दरात रोजच प्रति लिटर 80 पैशांची वाढ नोंदवली गेली असून ही वाढ अशीच चालू राहण्याची चिन्हे आहेत. मधल्या काळात सरकारने दरवाढ रोखून धरल्याने तेल कंपन्यांचे सुमारे 19 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले होते.
तेल कंपन्यांना आपला तोटा भरून काढण्यासाठी डिझेलच्या दरात सुमारे 24 रूपये 90 पैसे इतकी तर पेट्रोलच्या दरात 22 रूपये 30 पैसे इतकी वाढ करावी लागणार आहे असे एका आर्थिक संस्थेचे म्हणणे आहे. ही दरवाढ रोखण्यासाठी सरकारकडे उत्पादनशुल्कात कपात करणे हा पर्याय उपलब्ध आहे, पण सरकार आपले नुकसान सोसून जनतेचे भले करणार का हा सर्वांच्याच उत्सुकतेचा प्रश्न आहे.