पेट्रोल आणि डिझेल 4 रुपयांनी महागले, या राज्य सरकारने वाढवले इंधनाचे दर

Petrol and Diesel Price Hike: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी प्रतिलिटर चार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. ईशान्येकडील राज्य मिझोराममध्ये पेट्रोलसोबतच डिझेलच्या दरातही 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मिझोरामच्या एका मंत्र्याने बुधवारी ही माहिती दिली. मिझोरमचे मंत्री डॉ. वनलालथलना म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ही वाढ सामाजिक पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी पैसे उभारण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
जनतेच्या हितासाठी निर्णय –
डॉ. वनलाथलना म्हणाले की, सरकारने सामाजिक पायाभूत सुविधा आणि सेवा उपकर (सेस) साठी प्रति लिटर 2 रुपये आणि रस्त्याच्या देखभालीसाठी प्रति लिटर 2 रुपये आकारले आहेत. राज्यात 1 सप्टेंबरपासून नवीन किंमती लागू झाल्या आहेत. सरकारने हा निर्णय जनतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी घेतला आहे.
पेट्रोलची नवीन किंमत 99.24 रुपये आणि डिझेलची नवीन किंमत 88.02 रुपये –
सरकारने इंधनाच्या दरात केलेल्या या ताज्या वाढीनंतर राजधानीत सध्या एक लिटर पेट्रोलचा दर 99.24 रुपये आणि डिझेलचा दर 88.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. या नवीन वाढीपूर्वी राज्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 93.93 रुपये आणि डिझेलचे दर 82.62 रुपये प्रतिलिटर होते. ‘झोराम पीपल्स मूव्हमेंट’ पक्ष राज्यात सत्तेवर आहे, ज्याने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सरकार स्थापन केले होते.



