satara | पेटेश्वरनगर पेट्री बंगला हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

ठोसेघर, (प्रतिनिधी) – कास पठार परिसरातील पेटेश्वर शिक्षण संस्थेच्या आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर पेट्री बंगला या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले. दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाने आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
प्रतिक विजय शिंदे यांनी 94.20 टक्के मिळवून केंद्रात आणि विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. आशा संतोष आहिरे हिने 91 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर सानिका पांडुरंग मोरे आणि समीक्षा भरत गोगावले यांनी 89.40 टक्के गुण संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला.
डोंगराळ भागात असणाऱ्या या विद्यालयात रोज पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करून कुठली शिकवणी न लावता विद्यालयाच्या आणि शिक्षकांच्या योग्य नियोजनामुळे विद्यालयात होणाऱ्या जादा क्लासेसमुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल पालकांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांचे या उज्वल यशाबद्दल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेडगे, उपाध्यक्ष पांडुरंग शेडगे, सचिव शंकरराव जांभळे, खजिनदार महादेव आहिरे, संस्थापक श्रीरंग माने, संचालक अंकुश मोरे, प्रदीप सपकाळ , सखाराम शिंदे, परशुराम वारागडे इत्यादीनी अभिनंदन केले.





