न्यूयॉर्क : रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल व्हाईट हाऊसचे व्यापार विषयक सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. अलिकडच्या काही दिवसात नवारो यांनी सातत्याने भारतावर टीका करण्याचे सत्र आरंभले आहे. एलॉन मस्क लोकांच्या पोस्टवर आधारलेला प्रचार करत आहेत. भारत केवळ फायद्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत आहे. रशियाच्या आक्रमणापुर्वी भारत रशियाकडून तेल खरेदी करत नव्हता. पण भारत या संधीचा फायदा घेत आहे. युक्रेनमधील नागरिकांना मारणे थांबवा. अमेरिकेतील नोकऱ्या मिळवणे थांबवा, असे नवारो यांनी शनिवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नवारो यांनी यापुर्वी केलेल्या पोस्टवर भारतीय समुदायाने केलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देताना नवारो यांनी ही टीका केली. भारताकडून रशियाच्या तेलाची खरेदी रशियाच्या युद्ध मशिनला खाद्य पुरवते आहे. भारताकडून सर्वाधिक आयात शुल्क आकारले जाते. भारत अमेरिकेतल्या नोकऱ्याही मिळवत आहे, असे नवारो यांनी पूर्वीच्या पोस्टमद्ये म्हटले होते. त्यावर समुदायाने आक्षेप घेत नवारो यांचे दावे दुटप्पीपणाचे असल्याची टीका केली होती. देशाच्या उर्जा सुरक्षेसाठी रशियाकडून तेल खरेदी करणारा भारताला कायदेशीर आणि सार्वभौम अधिकार आहे. या खरेदीमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत नाही. भारतावर दबाव आणणाऱ्या अमेरिकेकडून रशियाच्या युरेनियमसारख्या अब्जावधी वस्तूंची आयात केली जाते. नवारो यांच्या दाव्यातून दुटप्पीपणा दिसून येतो, असे समुदायाने म्हटले होते. रशियाच्या कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी नवारो यांनी केलेला आक्षेप चुकीचा आणि दिशाभूल करणारा म्हणून भारताने फेटाळून लावला आहे.