Pete Hegseth : भारत- पाक संघर्ष थांबवल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याचे हेगसेथ यांच्याकडून समर्थन
भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या वर्षी झालेला संघर्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच थांबवला असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ (Pete Hegseth) यांनी म्हटले आहे.

Pete Hegseth : भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या वर्षी झालेला संघर्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच थांबवला असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ (Pete Hegseth) यांनी म्हटले आहे.
हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत हा महत्वाचा संरक्षण भागीदार असून अमेरिका आणि भारतादरम्यान संरक्षण सहकार्य वाढत असल्याचा पुनरुच्चारही हेगसेथ यांनी केला.
सिंगापूर येथे आयोजित शांग्री-ला संवादादरम्यान बोलताना हेगसेथ यांनी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या लष्करी संघर्षानंतर ट्रम्प यांच्या पुढाकाराने सहमती झाल्याचा दावा केला.
या प्रकरणी शांतता प्रस्थापित होण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे श्रेय त्यांनी ट्रम्प यांना दिले. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या मध्यस्थीने अण्वस्त्रसज्ज असलेले दोन्ही देश एकत्र आले. ही अध्यक्ष ट्रम्प यांची क्षमता आपण बघितली आहे, असे हेगसेथ (Pete Hegseth) म्हणाले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या चार दिवसांच्या संघर्षानंतर शांतता निर्माण करण्यासाठी आपणच मदत केल्याचा दावा ट्रम्प यांनी यापुर्वी वारंवार केला आहे. मात्र त्यांचा दावा भारताने वारंवार फेटाळून लावला आहे. संघर्ष थांबवण्यासाठीची सहमती दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाल्यानंतरच झाली.
यामध्ये कोणाही त्रयस्थाची कोणतीही भूमिका नव्हती, असे भारताने स्पष्ट केले आहे.भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हेगसेथ (Pete Hegseth) यांनी दोन्ही देशांचे कौतुकही केले. सध्याच्या प्रादेशिक घडामोडींबाबत पाक लष्कर आणि राजकीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांचाही हेगसेथ यांनी विशेष उल्लेख केला.






