PET Scan Center – स्व. खा. गिरीशभाऊ बापट पेट स्कॅन डायग्नोस्टिक सेंटर अखेर सुरू झाले असून, बुधवारी (२९ एप्रिल) दोन रुग्णांचे पेट स्कॅन यशस्वी झाले. शनिवारी (दि. २) रोजी आणखी दोन जणांचे स्कॅन केले जाणार आहे. अन्य खासगी रुग्णालयांच्या तुलनेत महापालिकेने पेट स्कॅनचे दर अत्यल्प ठेवले असून, अशा प्रकारे सेवा देणारी अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेतील ही पहिलीच महापालिका ठरली आहे. महापालिकेतर्फे बाबूराव सणस ग्राउंडसमोरील पेट स्कॅन डायग्नोस्टिक सेंटरचे महापालिका निवडणुकीची आचारसंहितेपूर्वी १५ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर हे सेंटर प्रत्यक्षात सुरू होण्याला मे महिना उजाडला. उद्घाटन होऊनही अनेक कामे प्रलंबित होती. पेट स्कॅन मशिन्सच्या चाचण्या, परवानग्या या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्या असून, अद्याप येथील लिफ्ट आणि राहिलेली अन्य बारीकसारीक कामे लवकर पूर्ण होतील, असे भवन विभागाकडून सांगण्यात आले. एक्सव्हिजन आणि महापालिकेच्या माध्यमातून हे सेंटर उभारले असून, कर्करोग कोठे पसरलेला आहे, गाठी असतील, तर त्याही या स्कॅनमध्ये दिसतात. एवढेच नव्हे, तर उपचार सुरू केल्यावर किंवा त्याआधी केमोथेरपी, शस्त्रक्रिया, की रेडिओथेरपी द्यावी, हेही यातून समजते. खासगी रुग्णालयांमध्ये पेटस्कॅनचे दर २२ ते २५ हजार रुपये आहेत, तर महापालिकेच्या या सेंटरमध्ये १० हजार रुपयांत हे स्कॅन केले जाणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. पालिकेची ४० टक्के गुंतवणूक एक्सव्हिजन आणि महापालिका या दोघांतर्फे हे सेंटर चालविण्यात येणार आहे. यामध्ये ६० टक्के कंपनी आणि ४० टक्के महापालिकेची गुंतवणूक आहे. महापालिकेने यासाठी जागा दिली असून, त्याचे नाममात्र भाडे आणि लाइटबिल संबंधित कंपनी भरणार आहे.