पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू आहे. यामुळे ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना मासिक सभा घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनाच बैठकीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मासिक सभा शक्यतो मोकळ्या जागेत घ्यावी, मास्क परिधान करावे, सोशल डिस्टनस पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक महिन्यात मासिक सभा घेतली पाहिजे, अशी सभा घेण्यास सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्तितीत उपसरपंच यांनी कसूर केल्यास त्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आहे. परंतू याबाबत सभा न घेण्यासाठी पुरेसे कारण होते किंवा नव्हते.
या प्रश्नावरील जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल अशी तरतूद कलम 36 मध्ये आहे. सद्यस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयच्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जमावबंदीचे काटेकोर पालन करत असताना ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जात नव्हती.
सभेस परवानगी
मासिक सभा घेताना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे बंधनकारक आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार दंडात्मक तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही संबधित पोलिस अधिकारी यांनी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.