लोकप्रतिनिधींनीच तोडली जलवाहिनी

गुन्हा दाखल ः आरोपींमध्ये नगराध्यक्षांचा पती आणि एक नगरसेवक
जेसीबी लावून उखडले पाईप ः पाण्यासाठी नागरिकांची वणवण

मला काहीच माहीत नाही…
याबाबत नगरसेवक अमोल शेटे यांनी सांगितले की, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा व नागरिकांच्या मागणीचा विचार करता 12 इंची पाईपलाईनवरून 6 इंची पाईपलाईन टाकल्याबाबत नगरपरिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक अमोल शेटे, नगरसेविका अनिता पवार, मंगल जाधव, प्राची हेंद्रे, काजल गटे, शोभा भेगडे, संध्या भेगडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश भेगडे, आशुतोष हेंद्रे, सचिन जाधव यांची बैठक झाली. घटनास्थळी पाहणी केली तेव्हा या पाईपलाईनला नगरपरिषदेने परवानगी दिल्याचे परवानगी पत्र पाणीपुरवठा कर्मचारी सुरज भेगडे यांनी दाखविले. त्यानंतर मी लग्नासाठी कोकणात निघून गेलो, मला काहीच माहिती नसताना माझे नाव देण्यात आले.

तळेगाव दाभाडे – येथील नगराध्यक्षा यांचे पती व एक नगरसेवक यांनी मोहर प्रतिमा रेसिडेन्सी या गृहप्रकल्पाच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन उखडून टाकून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. गृह प्रकल्पातील कुटुंबियांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली. दोन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मारुती मंदिर चौक (तळेगाव दाभाडे) ते मोहर प्रतिमा रेसिडेन्सी गृहाप्रकल्पापर्यंत एकूण 6 इंची 56 पाईप उखडून टाकत 8 लाख रुपयांचे नुकसान केले. ही घटना शनिवार (दि.30) सायंकाळी 4 ते रात्री 9 वा. घडली. या संदर्भात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संतोष शंकर तील्लोटकर रा. औंध पुणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नगरसेवक अमोल जगन्नाथ शेटे व तळेगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षांचे पती संदीप जगनाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे हद्दीतील मोहर प्रतिमा रेसिडेन्सी गृहप्रकल्पातील कुटुंबियांना पिण्याच्या पाण्यासाठी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियमानुसार पाईपलाईनची परवानगी घेतली. मारुती मंदिर चौक (तळेगाव दाभाडे) ते मोहर प्रतिमा रेसिडेन्सी दरम्यान 6 इंची 56 पाईप टाकून पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आरोपी नगरसेवक अमोल शेटे व संदीप जगनाडे यांनी दोन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दोन अज्ञात व्यक्‍तींनी पिण्याच्या पाण्याचे 56 पाईप उखडून पाईपलाईनचे नुकसान केले आहे. शनिवार (दि.30) पासून या गृहप्रकल्पातील कुटुंबियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. आरोपींनी गृहप्रकल्पातील कुटुंबियांचे पाणी बंद केल्याने त्यांच्या या लोकप्रतिनिधींविषयी संताप व्यक्‍त होत आहे. या पाण्याच्या पाईपलाईनला नगरपरिषदेची नियमानुसार परवानगी असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या पती संदीप जगनाडे व नगरसेवक अमोल शेटे यांनी या पाण्याच्या पाईपलाईनला परवानगी नसल्याने तोडल्याचे बोलले जात आहे. ऐन तीव्र उन्हाळ्यात गृहप्रकल्पातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याने त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

तळेगाव दाभाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगीरे करत आहेत. मुख्याधिकारी वैभव आवारे म्हणाले, या गृहप्रकल्पाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी त्यांनी परवानगी घेतली असून त्यांची पाईपलाईन उखडल्याने त्यांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यासाठी पुन्हा पाणीपुरवठा सुरु करण्याबाबत कारवाई सुरु आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.