घरोघरी जाऊन होतेयं जनजागृती

देहू प्राथमिक आरोग्य केंद्राकडून नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन
मावळ – जगभरात करोना विषाणू विरुद्ध युद्ध सुरू आहे. जवजवळ प्रत्येक देशात करोनाबाधित रुग्ण आहेत. त्याची लगण आता महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड पर्यंत आल्याने महाराष्ट्र शासनाने सतर्कतेचा इशारा म्हणून अनावश्यक प्रवास, उद्याने, प्रार्थनास्थळे बंद करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देत मावळातदेखील आज मोठ्या प्रमाणावर व्यवहार बंद होते.
करोना विषाणू संसर्गचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहू प्राथमिक आरोग्य केंद्राकडून (पीएचसी) विविध उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये करोनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत.
पुणे शहर व जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देहूरोड परिसरात करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे 14 कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती देत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ठिकठिकाणी या संदर्भातील जनजागृती करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. स्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छता राखणे, नाले व गटारात डीडीटी पावडर, औषध फवारणी करण्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात येत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान सुमारे अडीचशे ते तीनशे रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी करण्यात येत आहे. गरोदर असलेल्या महिलांना व त्यांच्या नातेवाइकांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून योग्य मार्गदर्शन व दक्षता घेण्यात येणार आहे.
माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचा अभिष्टचिंतन सोहळा रद्द
वडगाव मावळ – राज्याचे माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचा अभिष्टचिंतन सोहळा येथील महाविद्यालयात शुक्रवार (दि.20) रोजी नियोजित होता. देशात करोना विषणूने थैमान घातल्याने अभीष्टचिंतन सोहळा रद्द केल्याची माहिती संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी दिली. श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगाव मावळ या ठिकाणी होणारा मदन बाफना यांचा यावर्षीचा अभीष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले व सचिव अशोक बाफना यांनी सांगितले आहे. तसेच सर्व स्टाफ, विद्यार्थी, नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे व आपले आरोग्य व स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
देहूरोड बाजारपेठ बंद, रस्त्यावर शुकशुकाट
देहूरोड – करोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत देहूरोड बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. बाजारपेठ बंद असल्याने आज परिसरात शुकशुकाट आहे. राज्य सरकारने सर्व गर्दीची ठिकाणे असणारे सार्वजनिक क्षेत्र येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देहूरोड येथे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन पोलीस व कॅन्टोन्मेंट बोर्डाने केले होते. त्या अनुषंगाने सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करत आपली दुकाने बंद ठेवली होती.
नागरिकांनी काळजी घ्यावी
दहा वर्षांपेक्षा कमी असणारी मुले व 65 वर्षांपुढील वयोवृद्ध असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योग्य तो आहार घ्यावा. वारंवार हात स्वच्छ धुवावेत असे आवाहन पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव आणि डॉ. रणजित कांबळे यांच्याकडून करण्यात येत आहे.





