People Stuck In Lift – नवी सांगवी परिसरात मध्यरात्री लिफ्टमध्ये अडकलेल्या सात जणांचा तब्बल तीन तास जीव टांगणीला लागला होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने लिफ्ट अचानक बंद पडली. अखेर रहाटणी अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्वांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना नवी सांगवी येथील ‘आशा शंकर प्लाझा’ इमारतीत घडली. मध्यरात्रीच्या दोन वाजताच्या सुमारास सात जण लिफ्टमधून वर जात होते. मात्र, लिफ्ट तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या दरम्यान अचानक अडकली. काही वेळानंतर लिफ्टमधील नागरिकांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक नागरिकांनी अर्धा तास त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. मात्र त्यात यश न आल्याने अखेर या घटनेची माहिती पहाटे २.३५ वाजता रहाटणी अग्निशामक केंद्राला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना हवा मिळत असल्याची खात्री केली. त्यानंतर टेरेसवरील लिफ्टच्या कंट्रोल रूममधून लिफ्ट खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे तो प्रयत्न अपयशी ठरला. दरम्यान, सोसायटीकडून खासगी लिफ्ट मेंटेनन्स कर्मचाऱ्यांनाही बोलावण्यात आले. मात्र, त्यांनाही लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यश आले नाही. परिस्थिती गंभीर होत असल्याने अग्निशामक जवानांनी थेट रेस्क्यू मोहीम हाती घेतली. जवानांनी बाहेरील लोखंडी गज कापला. त्यानंतर लिफ्टच्या दरवाजाच्या पट्टीत तांत्रिक बदल केले. अखेर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास दरवाजा उघडण्यात यश आले. लिफ्टमध्ये अडकलेल्या सागर शिंदे, अपूर्व शिंदे, अनंतकुमार, वैशाली सिंग, शुभांगी सिंग, प्रखर सिंग आणि एका तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली. या लिफ्टची क्षमता चार जणांची असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यामध्ये सात जण असल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आणि लिफ्ट जाम झाली. या रेस्क्यू मोहिमेत अग्निशामक दलाचे जवान सचिन पालवे, प्रथमेश शितोळे, प्रतिक जवंजाळ, पृथ्वीराज पोवार, अभिजीत यादव आणि चालक सतीश साबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोणतीही जीवितहानी न होता सर्वांना बाहेर काढण्यात आल्याने नागरिकांकडून जवानांचे कौतुक केले जात आहे.