पुणे : सोमवारी शहरात सुमारे 5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मंगळवारीदेखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील 24 तासांत गोव्यासह राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. महाबळेश्वर येथे सर्वात कमी 15.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी पुणे येथे 27.4 अंश सेल्सिअस कमाल आणि 17.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर, पाषाण येथे 26.4 अंश सेल्सिअस कमाल आणि 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले आहे.