Lara Dutta : ‘लोक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये चुका शोधतात’; कैकेयीच्या भूमिकेवरून झालेल्या ट्रोलिंगवर लारा दत्ताने मौन सोडलं
Lara Dutta : रामायणातील लारा दत्ताचा पहिला लूक समोर आला तेव्हा तिने मरून रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला होता.

Lara Dutta : ‘रामायण’ हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर एक हजार कोटींच्या क्लबमध्ये सामिल होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून कलाकारांच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केलं जात आहे.
या चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ता हिने कैकेयीची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक होत असले, तरी पहिला लूक समोर आल्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
या ट्रोलिंगवर लारा दत्ताने मौन सोडलं असून लोक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये चुका शोधत असल्याचं म्हणत टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
कैकेयीच्या लूकवरून झाली होती ट्रोलिंग
रामायणातील लारा दत्ताचा पहिला लूक समोर आला तेव्हा तिने मरून रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. तसेच तिचे केस मोकळे सोडलेले होते. तिचा हा लूक पाहून अनेक सोशल मीडिया युजर्सनी टीका केली. काहींनी तर तिच्या लूकची तुलना हिंदी टीव्ही मालिकेतील सासूच्या पात्राशी केली होती.
ट्रोलिंगवर लारा दत्ताने सोडलं मौन
एका मुलाखतीत लारा दत्ताने या ट्रोलिंगवर आपली भूमिका स्पष्ट केली. ती म्हणाली, “आम्ही ते कपडे का निवडले आणि ते कशा पद्धतीने सादर करायचे होते, हे मला माहीत आहे. हा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे आणि लोक मात्र इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये चुका शोधत आहेत.”
कैकेयी ही केकय देशाची राजकन्या होती, त्यामुळे तिचे दागिने इतर दोन राण्यांपेक्षा वेगळे असायला नकोत का? तसेच ती स्वतःचे स्त्रीधन घेऊन आली नसेल का? असा प्रश्न तिने नितेश तिवारी यांना विचारला होता.
मात्र, अशा प्रत्येक ऐतिहासिक तपशिलाचा विचार करायला गेल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. इतिहासकार आणि इतर तज्ज्ञांकडूनही वेगवेगळे आक्षेप घेतले जाऊ शकतात. त्यामुळे मिथिला, अयोध्या आणि लंका या तीनही ठिकाणच्या संस्कृतींमधील फरक दाखवण्यासाठी एक विशिष्ट मापदंड निश्चित करण्यात आल्याचं लाराने सांगितलं.





