राज्यातील जनता पाण्यात आणि मुख्यमंत्री प्रचारात –अजित पवार

निफाड: शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या दिवशी निफाड सभेत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. भाजपा आणि शिवसेनेच्या हातात सत्ता आल्यावर राज्य अधोगतीकडे गेले असल्याची टीका अजित पवार यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पीक विमा कंपन्यांविरोधात आंदोलन करत आहेत. सत्तेत असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हे सरकार तर नौटंकी करत आहे, असे पवार यांनी सरकारला सुनावले.

आमची ताकद वाढली, असे सत्ताधारी म्हणत असतील पण सरकारने फक्त राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा वाढवला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचे श्रेय लाटण्याचे काम भाजपा-शिवसेना करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात देखील हे सरकार उदासीन आहे. अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. कित्येक शेतकऱ्यांना थकबाकीदार म्हणून हिणवले, यासंदर्भात फडणवीस सरकार का ठोस पाऊले उचलत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर सुद्धा अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री विदर्भात यात्रा करत आहेत म्हटल्यावर राज्यातील जनता पाण्यात आणि मुख्यमंत्री प्रचारात, हे मुख्यमंत्र्यांना शोभतं का? असा प्रश्न विचारण्याची वेळ जनतेवर आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सांगलीत बोट उलटून १४ जण दगावले आहेत. याला कोण जबाबदार? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

खा. अमोल कोल्हे यांनी देखील सरकारच्या ढिसाळ कारभारावर घणाघात केला. तरुणांच्या मनात राग आहे, अस्वस्थता आहे, तरुणांनी ठरवले तर हे सरकार उलथून टाकण्याची धमक राज्यातील जनतेत असल्याचे कोल्हे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.