माणसं जगली की मेली, हे पहायला सुद्धा चंद्रकात पाटील आले नाहीत- हसन मुश्रीफ

कोल्हापूर: कोरोना महामारीच्या कठीण काळात कोल्हापूरमधील माणसं काय करत आहेत, ती जगली की मेली हे सुद्धा पहायला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आले नाहीत. त्यामुळे सत्तेत असतो तर अधिक चांगलं काम केलं असतं असं म्हणणाऱ्या पाटील यांनी सर्वात प्रथम कोल्हापूरमध्ये यावं. सर्व पातळ्यांवर कोल्हापूरमध्ये कशापद्धतीने काम सुरु आहे हे पहावं, असं चोख उत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलंय.

महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीची महाजनादेश यात्रा चालू होती. त्यावेळी कोल्हापूर आणि परिसरात महापुरामुळे माणसं बुडायला लागली होती. तेव्हा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ती यात्रा सोडून कोल्हापूरला किती दिवसांनी आले, त्यांची टर कशापद्धतीने उडवली गेली आणि त्यानंतर सांगली व कोल्हापूरातून त्यांनी कसा काढता पाय घेतला, हे सबंध महाराष्ट्राने पाहिलं आहे.

मात्र, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आल्यानंतर सर्वात प्रथम अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्न-धान्य पुरवण्यापासून कर्ज माफी ते या संकटाच्या काळात महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम या सरकारने केलं आहे. त्यामुळे महापुराच्या वेळी भाजपाने चांगलं काम केल्याचा दावा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.