Chirag Paswan – बिहारची जनता ९० च्या दशकातील ‘जंगल राज’ आणि लालूंच्या कारकिर्दीचा काळ विसरू शकत नाही. राष्ट्रीय जनता दलाच्या कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री बनण्याचे फक्त स्वप्नच पडू शकते. विशेषत: तेजस्वी यादव यांचा स्वप्नभंग नक्कीच होईल. किमान २२५ जागा जिंकून राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारच शपथ घेतील, असे लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी म्हटले आहे. ‘तेजस्वी फक्त स्वप्न पाहत आहे’ चिराग पासवाम्हणाले की, लालू यादव यांच्या कारकिर्दीत बिहारमध्ये अराजकता, गुन्हेगारी आणि जातीयवादाचे वातावरण होते, ज्यामुळे बिहारमधील लाखो तरुणांना राज्य सोडावे लागले. बिहारमधील जनता पुन्हा त्या वातावरणामध्ये परतू इच्छित नाही आणि म्हणूनच येत्या निवडणुकीत एनडीएला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल, असा दावा त्यांनी केला. शिवाय समाजवादी पक्षासह संपूर्ण विरोधी पक्ष जातीयवादाला प्रोत्साहन देण्यात गुंतलेला आहे. विरोधी पक्ष आपली राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी भारताचे नुकसान करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांची नावे पुढे आणत आहेत. हे आक्षेपार्ह आहे. पासवान यांनी पुन्हा सांगितले की, एनडीए आगामी बिहार विधानसभा निवडणुका एकजुटीने लढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डबल इंजिन सरकारची विचारसरणी पुढील पाच वर्षांत बिहारला विकसित राज्य बनवण्याच्या दिशेने काम करेल. राजद आणि काँग्रेसमध्ये समन्वयाचा मोठा अभाव आहे. काँग्रेस आता राजदच्या दबावाला बळी न पडता पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच विरोधी आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे, एनडीए पूर्णपणे मजबूत आहे आणि एकत्रितपणे निवडणुका लढवेल.