Satara | अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी दंड

सातारा,(प्रतिनिधी) – सातारा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकप्रकरणी महसूल विभागाने केलेल्या कारवाईत दंडाचा आदेश होवूनही दंड न भरणार्या व्यक्तींच्या वाहनांची लिलाव प्रक्रिया दि. 3 सप्टेंबर रोजी सातारा तहसील कार्यालयात आवारात होणार असल्याची माहिती तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सातारा तालुक्यात अवैध व विनापरवाना उत्खनन व वाहतूक होणा-या गौणखनिज प्रकरणांमध्ये वेळोवेळी दंडात्मक कारवाया महसूल प्रशासनामार्फत करण्यात येतात.
मात्र दंडाच्या कारवाईचे आदेश झाल्यानंतरही अनेक व्यक्ती कसूरदार असूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात व शासनाच्या आदेशाकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करतात.
अनेक महिन्यांपासून वसूली प्रलंबित असणार्या उपप्रादेशीक परिहवन अधिकारी सातारा यांच्याकडे विना नोंदणी असलेल्या अशा अनुक्रमे इलेक्ट्रीक मोटरसह लोखंडी ट्रॉली 3, लोखंडी यारी -3, विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉली 7, विना नंबर ट्रॅक्टर-4, लोखंडी बोट 1, लोंखडी जाळी 2 अशी वाहने व इतर यंत्र सामुग्रीमधील प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम गुंतलेली आहे.
उपप्रादेशीक परिवहन अधिकारी सातारा यांच्याकडे नोंदणीकृत असलेली एकूण 4 वाहनांमध्ये एकूण 11 लाख 59 हजार 56 इतक्या रकमेच्या वसुलीसाठीचे सर्व कायदेशीर उपाययोजना करुनही दंडाची रक्कम वसूल न झाल्याने उपविभागीय अधिकारी सातारा सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार संबंधित दंड रक्कम थकबाकीदारांच्या वाहनांचा व इतर यंत्र सामुग्रीचा लिलाव करून दंडाची रक्कम धडक कारवाईद्वारे वसूल करण्यात येणार आहे.





