पिंपरी | काळ्या काचा लावणाऱ्यांकडून चार लाखांची दंडात्मक वसूली

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट व काचेला काळी फीत (टीन्ट ग्लास) लावणाऱ्यांवर कारवाइचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी वाकड परिसरात तपासणी करून दंडात्मक कारवाइ केली. शनिवारी (दि. 30) 406 वाहनांवर कारवाई करत 4 लाख 37 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
फिनिक्स मॉल वाकड आणि थेरगाव येथे केलेल्या कारवायांमध्ये ही दंडात्मक वसूली करण्यात आली आहे. फिनिक्स मॉल वाकड येथे कारवाई करत दिवसभरात एकूण 305 वाहनांच्या काळ्या काचा पोलिसांनी उतरवल्या आहेत. तसेच संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा कारवाई होत असल्यास 500 रुपये दंड केला जातो.
एकदा कारवाई करूनही काळ्या काचा काढल्या नाहीत तर पुन्हा कारवाई करताना वाहन चालकावर 1 हजार 500 रुपयांचा दंड केला जातो. वाकड येथील कारवाईमध्ये 2 लाख 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाकड वाहतूक विभागाने थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोर देखील कारवाई केली. रस्त्यावर पार्क होणाऱ्या 47 वाहनांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.





