पुणे जिल्हा | आळेफाटामध्ये शांततेत मतदान

आळेफाटा, (वार्ताहर) – आळेफाटा (ता.जुन्नर) परिसरातील आळे, आळेफाटा, कोळवाडी, संतवाडी, राजुरी, उंचखडक, वडगाव आनंद, पादीरवाडी, बोरी बुद्रुक, माळवाडी, जाधववाडी, भोरवाडी, नगदवाडी, वडगाव कांदळी या गावांमध्ये अतीशय शांत पद्धतीने मतदान पार पडले. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात गर्दी झाली होती, त्यानंतर दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत अतीशय कमी गर्दी मतदान केंद्रावर होती. दुपारी दोननंतर चांगली गर्दी होती. यामध्ये विशेष करुन महिला मतदारांचा मोठा सहभाग यामध्ये होता.
दरम्यान, वडगाव आनंद गावात मतदान केंद्र क्रमांक 192 व 193 हे आदर्श मतदान केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर सकाळपासूनच युवा मतदारांनी मोठ्या संख्येने रांगा लावत या ठिकाणी मतदान केलेले दिसून येत आहे.
या मतदान केंद्राकडे निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे, तहसीलदार रवींद्र सबडीस गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, सहायक गट विकास अधिकारी निलेश बुधवंत या सर्वांचे मार्गदर्शनाखाली सर्वाधिकारी कर्मचारी तसेच बीएलओ यांनी अतिशय छान काम करत निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
या आदर्श मतदान केंद्रात खर्या अर्थाने निवडणूक आयोगाला जे अपेक्षित आहे, त्या सर्व सुविधा त्यात सुंदर अशा रांगोळीने मतदार राजाचे स्वागत करण्यात आले, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सुंदर असा मंडप या ठिकाणी घालण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिलांना आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी हिरो कधी कक्ष, गर्दी झाल्यानंतर प्रतीक्षा कक्ष वाचनालयाची व्यवस्था अशा विविध व्यवस्था केल्या कारणाने मतदारांमध्ये देखील आनंदाचे वातावरण दिसून आले.
या कामी विशेष सहकार्य लाभले ते ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप खिलारी, तुकाराम वाळुंज, उमेश गडगे, शाम वाळुंज, राहुल वाळुंज, तसेच शाळा व्यवस्थापनाच्या वतीने शिक्षण तज्ज्ञ डी. बी. वाळुंज यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.





