शांतता समितीच्या बैठकीस अधिकाऱ्यांचीच दांडी

पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करत बैठकीवर टाकला बहिष्कार
संगमनेर – अपर पोलीस अधीक्षकांपासून नगरपालिका वगळता सर्वच विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याने शांतता समिती बैठकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की पोलीस प्रशासनावर आली, तर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करत बैठकीवर बहिष्कार घातला.
गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी आज सांयकाळी चार वाजता शांतता समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आणि विविध विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार होते. मात्र पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, सहायक गटविकास अधिकारी मराठे बैठकीसाठी उपस्थित होते.
नेहमीच्या बैठकीत नगरपालिका, महावितरण, जलसंपदा, दारूबंदीसह कायदा सुव्यवस्थेवर चर्चा होत असते. यावेळी देखील या विभागाचे अधिकारी विविध पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून लक्ष्य होण्याची शक्यता होती. तासभर या अधिकाऱ्यांची वाट पाहिल्यावर निरीक्षक परमार यांनी तहसीलदार साकूरहून येत असल्याचे, तर अन्य अधिकाऱ्यांना बैठकीची कल्पना दिली होती,असे सांगितले.
मात्र अधिकारीच नसतील, तर बैठक घेऊ नका, असे सांगत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. बैठकीसाठी यावेळी महिलांची देखील संख्या मोठी होती. विवेक कासार, किशोर पवार, संग्राम जोंधळे, विश्वास मुर्तडक, अमर कतारी, शरिफ शेख, अशोक सातपुते, किशोर चव्हाण, राजेंद्र सांगळे, ज्ञानेश्वर कर्पे, राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.





