प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेकडून निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी गुरूवारी (दि. २०) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, पाच दिवसांनंतर देखील हा पाणीपुरवठा सुरळित करणे महापालिका प्रशासनाला शक्य झाले नाही. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असून त्यासाठीची प्रशासकीय कामे जोरात सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे शहरातील मतदारांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. गुरूवारी पाणीपुरवठा बंद केल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी सुरळित होणे अपेक्षित होते. मात्र, शहरातील विविध भागांमध्ये पाणीगळती आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक भागात पाणी आले नाही. काही ठिकाणी बुधवारी देखील पाणीपुरवठा झाला नव्हता त्यामुळे नागरिकांना तब्बल पाच दिवस पाण्याविना काढावे लागले. परिणामी, नागरिकांनी पाणी विक्री केंद्रांवर गर्दी केली होती. यामधून नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. शहरातील पिंपळे गुरव, दिघी-दत्तनगर, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी रुपीनगर, भोसरी, बिजलीनगर, शाहूनगर तसेच चिखली परिसरात मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असून, अनेक ठिकाणी पाणी येतच नाही. काही भागांत तर नळ कोरडे राहिल्याने नागरिकांना खासगी टँकर मागवण्याची वेळ आली. या परिस्थितीने महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नि गडी-प्राधिकरण सेक्टर २८ परिसरात चार दिवस सलग पाणीपुरवठा झाला नाही. शनिवारीही पाणी न आल्याने महापालिकेने फक्त दोन टँकर दिले, मात्र हे टँकर लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरे पडले. परिणामी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःहून खासगी टँकर व पाण्याचे जार उपलब्ध करून दिले.चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, घरकुल परिसराला रावेत पंपिंग स्टेशनहून पाणी मिळते, पंपिंग स्टेशनमधील वारंवार बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प होतो. गेल्या दोन दिवसांत नियोजित वेळेत पाणी न मिळाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. चिखली परिसरातील दाट लोकसंख्या लक्षात घेऊनही पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या भागातील नागरिकांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल झाले. अधिकारी, कर्मचारी नॉट रिचेबल परिसरात पाणी येत नसल्याने स्थानिक सामाजित कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन केले. मात्र, काहींचे फोन लागत नव्हते तर काहीजण प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला माजी नगरसेवकांना सामोरे जावे लागले. “शाहूनगर परिसरामध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाणी नाही. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. एवढ्या मोठ्या परिसरासाठी दोन टँकर पाठवले होत. रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, महापालिका प्रशासनाने ही बाबा गांभीर्याने घेऊन पुरेसे पाणी देणे आवश्यक आहे.” – सुप्रिया चांदगुडे, सामाजिक कार्यकर्त्या