PCMC School – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या खराळवाडी येथील उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये मंगळवारी (दि. १८) अळ्या सापडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पालक व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात ॲड. सागर चरण यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नामध्ये स्पष्टपणे कीटक दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार अन्न पुरवठा व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणाचे द्योतक मानला जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या स्वच्छतेबाबत महापालिकेची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, या घटनेमुळे अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यात मोठी त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार ‘अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६’ मधील कलम २६, २७, ५१ व ५९ यांचे उल्लंघन ठरतो. यामध्ये सुरक्षित व स्वच्छ अन्न पुरविण्याची जबाबदारी, तसेच निकृष्ट व असुरक्षित अन्नाबाबत दंड व शिक्षेच्या तरतुदींचा समावेश आहे. याशिवाय ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ अंतर्गतही संबंधितांवर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये निष्काळजीपणामुळे आजाराचा प्रसार होण्याची शक्यता व अयोग्य अन्न वितरणाबाबतची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करून संबंधित अन्न पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी ॲड. चरण यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेच्या अन्न पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे.