PCMC Property Tax Restructuring – पिंपरी-चिंचवड शहराचा झालेला विकास लक्षात घेऊन मिळकतकर वसुलीतील सुसूत्रतेसाठी अ, ब आणि क अशा वर्गवाऱ्यांमध्ये बदल करून फक्त अ आणि ब अशा दोनच वर्गवाऱ्या ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात ५० कोटी रुपयांची वाढ होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. यामुळे काही भागातील नागरिकांचा मिळकत कर वाढण्याची शक्यता आहे. विविध गावे मिळून पिंपरी-चिंचवड शहराची निर्मिती झाली आहे. शहरात निवासी, औद्योगिक, मोकळ्या जमिनी अशा सात लाख ८४ हजार ४२० नोंदणीकृत मिळकती आहेत. महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मिळकतकर आहे. नागरिकांना मुलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली. त्यानंतर साधारण तीन टप्प्यांत लगतच्या गावांचा समावेश झाला. शिवाय, झोपडपट्ट्या, चाळी, बैठी घरे, जुन्या इमारती, गृहनिर्माण सोसायट्या, समाविष्ट गावांचा विकास झाल्याने तिथे बांधकामे वाढली. या मिळकतींकडून महापालिकेच्या वतीने करआकारणी केली जाते. त्याची अ, ब आणि क अशी वर्गवारी आहे. वर्गवारीनुसार करआकारणी केली जाते. सद्य:स्थितीत शहरातील ब आणि क या वर्गातील भागांमध्ये झपाट्याने विकास झाला असला, तरीही या भागातील मिळकतींना कमी दराने करआकारणी होते. म्हणून महापालिकेने वर्गवारीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मिळकतकर वाढ.(संग्रहित छायाचित्र) सध्यस्थितील विभागनिहाय गावे अ विभाग : निगडी प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, महापालिका भवन, फुगेवाडी, दापोडी, भोसरी या करसंकलन विभागीय कार्यालयातील सर्व समाविष्ट गट आणि १९९७ मध्ये समाविष्ट थेरगावचा भाग. ब विभाग : थेरगाव कार्यालयांतर्गत भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती, भूमकर वस्ती, दिघी, बोपखेल कार्यालयांतर्गत साई पार्क, आदर्शनगर, दिघी गावठाण परिसर. क विभाग : चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे विभागातील सर्व भाग, थेरगाव अंतर्गत पुनावळे गावठाण, जीवननगर, निंबाळकरनगर, ताथवडे गावठाण, फुगेवाडी, दापोडी कार्यालयांतर्गत बोपखेल आणि शहरातील सर्व झोपडपट्ट्या प्रस्तावित विभागनिहाय गावे अ विभाग : निगडी प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, महापालिका भवन, फुगेवाडी दापोडी, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली, वाकड कस्पटेवस्ती आणि किवळे कार्यालयांतर्गत रावेत. ब विभाग : तळवडे व दिघी बोपखेल कार्यालयांतर्गत समाविष्ट सर्व भाग, किवळे कार्यालयांतर्गत किवळे, मामुर्डी, विकासनगर आणि शहरातील सर्व झोपडपट्ट्या. अशी असेल करवाढ शहरातील मिळकतींची केवळ अ आणि ब अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. निवासी मालमत्तांना अ वर्गात ३२२ रुपये, ब वर्गात ३०६ रुपये प्रतिचौरस मीटर असा कर असेल. बिगरनिवासी मिळकतींना अ वर्गात ९६७ रुपये, तर ब वर्गात ९१९ रुपये प्रतिचौरस मीटरप्रमाणे कराची आकारणी केली जाणार आहे. या विषयाला सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर एक एप्रिल २०२६ नंतर नोंदणी झालेल्या आणि यापुढे नोंदणी होणाऱ्या नवीन मिळकतींसाठी हे दर लागू केले जाणार आहेत.