प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची अचानक बदली झाल्यामुळे पालिकेतील २५ संवर्गातील ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदाेन्नती रखडल्या आहेत. त्यामुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नुकसान हाेत असून लवकरात-लवकर पदाेन्नती मिळावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची ७ ऑक्टाेबर राेजी नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून बदली झाली. महामेट्राेचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार राज्य सरकारने साेपविला आहे. सिंह यांची बदली हाेण्यापूर्वी महापालिकेतील दाेन सह शहर अभियंता, दाेन कार्यकारी अभियंता, एक सहआयुक्त या पदांसह विविध पदांवर ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदाेन्नती मिळणार हाेती. त्यासाठी पदाेन्नती समितीची बैठक झाली हाेती. सिंह यांची बदली झाल्याने यावर अंतिम निर्णय हाेऊ शकला नाही. दरम्यान, प्रभारी आयुक्त हर्डीकर हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गेले हाेते. त्यामुळे त्यांना पदाेन्नती समितीची बैठक घेणे शक्य झाले नाही. हर्डीकर पुन्हा महापालिकेच्या कामकाजामध्ये साेमवार (दि.१७) पासून सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी. त्याचबराेबर काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महापालिकेतील सेवेतील कालावधी ३० नाेव्हेंबरअखेर संपुष्टात येत आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त हाेण्यापूर्वी पदाेन्नती मिळाल्यास पेन्शनमध्ये वाढ हाेईल, त्यामुळे लवकरात-लवकर पदाेन्नती व्हावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.