PCMC News – जागतिक तापमान वाढीने निर्माण होणाऱ्या समस्या आणि उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्य विषयी गंभीर समस्या निर्माण होत आहे. यावर नागरिकांचा बचाव करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मार्गदर्शक सूचना, प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने हिट ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. परंतु, उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विसर महापालिकेला पडला असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या पाहणीत वाकड, रावेत, मोशी, चिखली, दिघी, रावेत यासह अन्य भागात प्रचंड उष्णतेचा प्रभाव दिसून येत आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी जागतिक तापमानात वाढ होत असून दैनंदिन कामकाज करताना अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. तापमान बदल व वाढत्या उष्णतेबाबत पुरेशी काळजी आणि उपाययोजना केल्या नाही तर उद्भवणार्या समस्यांचा प्रत्येक घटकाला सामना करावा लागणार आहे. तापमान वाढ शहरात उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्य विषयी गंभीर समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे उद्भवणार्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि उष्माघात या आजारांचा समावेश आहे. याशिवाय त्वचा संदर्भात समस्या देखील उद्भवत आहेत. वातावरणातील कमाल तापमानात ४ डिग्री ते ५ डिग्रीपेक्षा अधिक वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सर्वसामावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा व महापालिका स्तरावर प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले होते. त्या मार्गदर्शक सूचनांचा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास विसर पडला आहे. त्यामुळे उष्णतेच्या बचाव करण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट होवू लागली आहे. जास्त धोका कुणाला? – ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती – ५ वर्षे वयोगटापर्यंतची मुले, गरोदर माता – मधुमेह व हृदयविकार असणारी व्यक्ती – अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती लक्षणे – थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे – भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे, डोके दुखणे, पायात गोळे येणे – रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थ वाटणे