PCMC News – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आता ऊर्जा बचतीसाठी मोठी पावले उचलण्याच्या तयारीत आहे. महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींमध्ये वीज बचत, खर्च नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन साध्य करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्य प्रशासकीय भवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महापालिकेच्या इमारतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या एसी यंत्रणा, वॉटर पंप आणि अन्य विद्युत उपकरणांचा वीज वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ऊर्जा बचतीचे उपक्रम केवळ अहवाल आणि सादरीकरणापुरते मर्यादित न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. “ऊर्जा बचतीतून प्रत्यक्ष परिणाम दिसले पाहिजेत. वीज वापरात घट आणि कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापनासाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे,” असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे उपस्थित होते. तसेच आशियन डेव्हलपमेंट बॅंक, अॅलायंस फाॅर एन एनर्जी इफिशिएंट इकोनाॅमी आणि काॅउंसिल आॅन एनर्जी, एन्वायरमेंट अॅंड वाॅटर या संस्थांचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड महापालिका. महापालिकेने यापूर्वीच AEEE संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत ADB आणि CEEW यांच्या सहकार्याने ऊर्जा कार्यक्षमतेसंदर्भातील अभ्यास आणि नियोजन सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वीज वापराचे विश्लेषण, ऊर्जा बचतीच्या संधी, आर्थिक व्यवहार्यता आणि निधी संरचना यावर काम केले जात आहे. बैठकीत इन्सेप्शन रिपोर्ट, वित्तीय स्थिती अहवाल, ऊर्जा खर्च विश्लेषण, प्राथमिक आर्थिक मॉडेल, निधी उभारणीचे पर्याय आणि प्री-फिजिबिलिटी स्टडी यांचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले. ऊर्जा बचत प्रकल्पांची अंमलबजावणी करताना दीर्घकालीन शाश्वतता आणि प्रत्यक्ष बचतीचे मोजमाप यावर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. “ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक गरज नाही. ती पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाची आहे. आधुनिक ऊर्जा तंत्रज्ञानाच्या वापरातून वीज खर्च कमी करणे, कार्बन उत्सर्जन घटवणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.” – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका