PCMC News : वाढती लोकसंख्या, झपाट्याने विस्तारत जाणारे शहर आणि नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आठ प्रभाग समित्यांच्या जागी आता दहा स्वतंत्र क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कार्यालयांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासनाला ‘किल्लेदार’ ओळख मिळणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले. २५ मे २०२६ पासून ही नवीन प्रशासकीय रचना प्रत्यक्षात लागू होणार आहे. नागरिकांना नागरी सुविधांसाठी मुख्य कार्यालयांवर अवलंबून राहावे लागत होते. तक्रारी, दाखले, कर भरणा, पाणीपुरवठा, बांधकाम परवाने आणि इतर कामांसाठी नागरिकांना मोठा प्रवास करावा लागत होता. आता नवीन क्षेत्रीय कार्यालयांमुळे ही गैरसोय कमी होणार आहे. महापालिकेने २०२५-२६ च्या निवडणूक प्रभाग रचनेनुसार शहरातील ३२ प्रभागांचे नव्याने विभाजन केले आहे. प्रत्येक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात निश्चित प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासन अधिक वेगाने काम करणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व कार्यालयांना ‘राजगड’, ‘रायगड’, ‘सिंहगड’, ‘प्रतापगड’, ‘पुरंदर’, ‘शिवनेरी’, ‘तोरणा’, ‘लोहगड’, ‘देवगिरी’ आणि ‘विजयदुर्ग’ अशी ऐतिहासिक नावे देण्यात आली आहेत. शिवकालीन वारसा आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख जपण्याचा प्रयत्न प्रशासनाने या माध्यमातून केला आहे. अशी आहे कार्यालयांची रचना निगडी प्राधिकरण परिसरातील कार्यालयाला ‘राजगड’ नाव देण्यात आले असून त्याअंतर्गत १३, १४ आणि १५ क्रमांकाचे प्रभाग असतील. चिंचवडगाव लिंक रोड येथील कार्यालय ‘सिंहगड’ म्हणून ओळखले जाणार आहे. भोसरीतील नेहरूनगर कार्यालयाला ‘विजयदुर्ग’ तर रहाटणीतील कार्यालयाला ‘देवगिरी’ नाव देण्यात आले आहे. भोसरी नाशिक रोडवरील कार्यालय ‘शिवनेरी’ म्हणून कार्यरत राहणार आहे. निगडी टिळक चौकातील कार्यालय ‘तोरणा’ म्हणून ओळखले जाईल. थेरगाव येथील कार्यालयाला ‘पुरंदर’, कासारवाडीतील कार्यालयाला ‘प्रतापगड’ आणि ताथवडे येथील कार्यालयाला ‘रायगड’ हे नाव देण्यात आले आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरातील कार्यालय ‘लोहगड’ नावाने कार्यरत राहील. “शहराचा भौगोलिक विस्तार मोठा झाला आहे. नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी ही पुनर्रचना महत्त्वाची ठरेल.” – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका