PCMC News – पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि स्वदेशी उत्पादनांच्या वापरासाठी आता पिंपरी-चिंचवड शहर मोठे पाऊल उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून “हरित, ऊर्जा सक्षम आणि आत्मनिर्भर पिंपरी-चिंचवड” ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहराला स्मार्ट, ग्रीन आणि सस्टेनेबल बनविण्याचा निर्धार या माध्यमातून करण्यात आला आहे. महापौर रवि लांडगे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना लेखी सूचना दिल्या आहेत. महापालिका प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शाळा, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि सामाजिक संघटना यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. ही मोहीम केवळ सरकारी उपक्रम न राहता ‘जनआंदोलन’ बनविण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत शहरात ऊर्जा बचतीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. “नो पॉवर अवर” सारखे उपक्रम राबविले जातील. “सौर पिंपरी-चिंचवड” मोहिमेद्वारे सौरऊर्जेचा वापर वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापालिका इमारतींसह विविध ठिकाणी ऊर्जा बचतीचे मॉडेल विकसित केले जाणार आहे. शहरात वृक्षसंवर्धनासाठी “एक कर्मचारी – एक वृक्ष” ही मोहीम राबविण्यात येणार आहे. टेरेस गार्डन आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी यासाठी विशेष जनजागृती मोहिमाही राबविली जाणार आहे. रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी ई-वाहन आणि चार्जिंग स्टेशनला प्रोत्साहन दिले जाणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी “सायकल टू वर्क डे” ही संकल्पनाही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इंधन बचतीसोबतच प्रदूषण कमी करण्यावर भर राहणार आहे. महापालिकेच्या कामकाजातही मोठे बदल होणार आहेत. कागदाचा वापर कमी करण्यासाठी ‘पेपरलेस प्रशासन’ संकल्पना राबविण्यात येईल. तसेच प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी व्हर्च्युअल मीटिंग आणि वर्क फ्रॉम होम धोरणालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. महापालिका उपाहारगृहांमध्ये “ऑईल फ्री हेल्दी कॅन्टीन” संकल्पना सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी “स्वदेशी बाजार – आत्मनिर्भर पीसीएमसी” उपक्रम राबविला जाणार आहे. गृहनिर्माण संस्था आणि सामाजिक संस्थांमध्ये “ग्रीन रेटिंग” स्पर्धा घेतली जाणार आहे. आगामी गणेशोत्सव आणि इतर सण ‘हरित उत्सव’ संकल्पनेतून साजरे करण्यावरही भर राहणार आहे.“ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. पिंपरी-चिंचवड शहर पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श ठरेल,” असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला. या मोहिमेमुळे शहरात हरित ऊर्जा, स्वच्छता, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.