PCMC News – महापालिकेच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अनामत रक्कम आणि भाडे वसुलीत अनियमितता झाल्याचे प्रकरण पुढे आले. मात्र, सामान्य़ प्रशासन आणि आयुक्तांच्या दप्तर दिरंगाईमुळे पुढे कारवाई रखडली होती. अखेर या प्रकरणात लिपिक, मुख्य लिपिकपदावरील १० कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत ५० लाखांची रक्कम जमा करण्यास प्रशासनाने बजावले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सन २०१८ ते २०२४ या कालावधीत क्रीडा विभागाकडून लिपिक, मुख्यलिपिक हे कार्यरत होते. तसेच व्यवस्थापक म्हणून नाट्यगृहाची जबाबदारी काही कर्मचाऱ्यांवर देण्यात आली होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेले कार्यक्रम व रक्कम किती जमा झाली आहे, याचा हिशेबच ठेवला नाही. हा प्रकार तब्बल सहा वर्षे सुरू होता. काही कर्मचाऱ्यांनी ही रक्कम महापालिकेत जमा न करता थेट स्वतःच्या खिशात घातली. हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेच्या क्रीडा विभागाने संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली. क्रीडा विभागाकडे कामकाज आल्यानंतर दप्तर तपासणीत झालेले कार्यक्रम आणि प्रत्यक्षात जमा झालेली रक्कम यात तफावत आढळून आली. नंतर अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे कार्यक्रमाच्या भाड्यापोटी जमा झालेली लाखो रुपये रक्कम तिजोरीत भरली नसल्याचे निदर्शनास आले. पिंपरी चिंचवड महापालिका. दरम्यान, नाट्यगृह भाड्याने देताना अनामत रक्कमा न घेणे, भाडे वसुलीची परस्पर विल्हेवाट लावणे, इतर साहित्य, साधन सामुग्रीचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला. तसेच, त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर सामान्य प्रशासन व आयुक्तांना या कार्यवाहीसाठी मूहूर्त मिळाला. लेखापरिक्षण अहवालानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याकडून वसूलपात्र रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण ५० लाख ७० हजार ६२६ रुपये रक्कम वसुल केली जाणार आहे. दहा दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास व खुलासा करण्यास कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी बजावले आहे. या कर्मचाऱ्यांना नोटीस आयुक्त सुर्यवंशी यांनी ३० एप्रिल रोजी एकूण १० लिपिक, मुख्य लिपिक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये मुख्य लिपिक कांतीलाल वाघेरे, उमेश बांदल, मनोज भूतकर (सेवानिवृत्त), लिपिक राहूल ककरोठी, अभिषेक हिंगे, संकेत जंगम, संतोष बोत्रे, अमर निकाळजे, अतुल काळे, अशोक केंगले यांचा समावेश आहे. “प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कामकाजात गैरवर्तन आणि अनियमितता आढळून आली. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले असून या प्रकरणी दहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा देखील मागविण्यात आला आहे.” – मनोज लोणकर, सहआयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका