प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संक्रांतीनंतर अगदी दुस-याच दिवशी मतदान आहे. त्यामुळे शहरातील भावी नगरसेवकांची चिंता वाढली आहे. महिला मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करताना खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, याचा मोठा पेच उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांनी गेल्या काही वर्षांत प्रभागांमध्ये सक्रीय राहून सामाजिक कार्यक्रम, सणसमारंभ, वाढदिवस, शुभेच्छा भेटी अशा माध्यमातून संपर्क जपण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. निवडणुका पुढे ढकलल्याने या काळात झालेला खर्च वाढत गेला; आणि आता संक्रांतीच्या तोंडावर निवडणुका समीप आल्याने या खर्चात आणखी वाढ होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मकरसंक्रांती म्हणजे हळदी-कुंकूसह सौभाग्यदानाच्या वस्तू (वाण) आणि भेटवस्तू देण्याची परंपरा. शहरातील मोठ्या प्रमाणावरील महिला मतदारांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू यामुळे यंदा भावी उमेदवार बनले आहेत. कोणत्या भेटवस्तू द्यायच्या, किती प्रमाणात द्यायच्या, आणि कुणाला नाराज न करता सर्वांना खूश कसे ठेवायचे, याचा हिशेब अनेक इच्छुक उमेदवार जुळवताना दिसत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांची नाराजी उमेदवारांना महागात पडू शकते, याची जाणीव राजकीय इच्छुकांना झाली आहे. त्यामुळे ‘संक्रांतीत उमेदवारांवर संक्रांत’ असा उपरोधिक टोला अनेक ठिकाणी मारला जात आहे. संक्रांत आणि निवडणुकीचा थेट संबंध नसला तरी मतदानाच्या अगोदरच येणारा हा सण उमेदवारांसाठी खर्च, अपेक्षा आणि राजकीय समीकरणांचा मोठा कस पाहणारा ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महिलांची मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात असून अनेक प्रभागांत त्या निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांचे मन जिंकण्यासाठी गृहउपयोगी वस्तू, आधुनिक गिफ्ट सेट, वाणातील आकर्षक साहित्य याबाबत चर्चांना उधाण आले आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, हा सण आपुलकी व स्नेह वृद्धिंगत करणारा असला तरी यंदा तो महिला मतदारांसाठी ‘सुवर्ण संधी’ ठरत आहे, तर उमेदवारांसाठी खर्चाची कसरत आणि अपेक्षांची परीक्षा ठरत आहे.