प्रभात वृत्तसेवा दापोडी – दापोडी प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी घरभेटी आणि पदयात्रेतून विकासाचा संकल्प मांडला. यावेळी भाजप आणि स्थानिक नागरिकांनी ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास’ चा नारा दिला.या प्रभागातून अनुसूचित जाती (अ गट) महिला उमेदवार चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे, अनुसूचित जमाती महिला (ब गट) मधून उषा अंकुश मुंढे, नागरिकांचा मागासवर्ग महिला (क गट) मधून प्रतिभा रघुनाथ जवळकर, तर सर्वसाधारण गटातून संजय (नाना) काटे हे चारही उमेदवार भाजपच्या पॅनलमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.भाजपाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या ध्येयवाक्याचा पुनरुच्चार करत प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर थेट संवाद साधला. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते व वाहतूक, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडत प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त केल्या.या जनसंपर्कादरम्यान सामाजिक समता, सर्वांना समान संधी, दुर्बल व वंचित घटकांचा सर्वांगीण विकास यावर विशेष भर देण्यात आला. कोणताही भेदभाव न करता सर्व समाजघटकांसाठी समान विकासाची भूमिका भाजपाने ठामपणे मांडली. प्रभागातील युवक, महिला, कामगार, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. स्थानिक विकासकामे, स्वच्छता अभियान, सार्वजनिक सुविधांचा दर्जा उंचावणे आणि सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येईल. येथील वाझ चाळ, साळवे चाळ, जाधव चाळ, काची चाळ, गुलाब काटे चाळ,जयभिम नगर आदी परिसरात उमेदवारांनी भेटी दिल्या. होली क्रॉस चर्चचे फादर अल्बर्ट फर्नांडिस, अरविंद पंडित, हॅरी अँथोनी, सतिश पटेकर, सनी गजभिव, दाविद बळीद, रतन जाधव, नितीन गायकवाड, किशोर तुपे, सेल्वराज सेबास्टियन, स्टेला वाज, अगस्ति डिसोझा, लिओनेल वाज आदी उपस्थित होते.