प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेवारी अर्ज दाखल केले आहेत. शहरातील ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठी तब्बल १९९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांची छाननी पूर्ण झाली असून त्यामध्ये ९९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. आता १२८ जागांसाठी १८९४ उमेदवार रिंगणात आहेत. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यामुळे २ जानेवारी रोजी सायंकाळी संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.महापालिका निवडणुकासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. अर्ज स्वीकृती, छाननी आणि इतर निवडणूक कामकाजासाठी महापालिकेच्या वतीने ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहे. या कार्यालयांमध्ये मुदतीमध्ये १९९३ जणांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी आणि गुरुवारी या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये ९९ जणांचे अर्ज बाद झाले असून १,८९४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण २९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १२ अपात्र झाले असून २७९ वैध ठरले आहेत. ब क्षेत्रीय कार्यालयात ३०४ उमेदवारांपैकी एकाचाही अर्ज बाद झाला नसून ३०४ उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. क क्षेत्रीय कार्यालयात २४६ पैकी ५ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. तर २४१ जणांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ड क्षेत्रीय कार्यालयात २३६ पैकी ७ जणांचे अर्ज बाद झाले असून २२९ जणांचे अर्ज वैध आहेत. इ क्षेत्रीय कार्यालयात १६० पैकी ६ जणांचे अर्ज बाद झाले असून १५४ जणांचे अर्ज वैध आहेत. फ क्षेत्रीय कार्यालयात २०८ अर्ज आले असून त्यापैकी ८ जणांचे अर्ज बाद झाल्याने २०० जणांना निवडणूक लढवता येणार आहे. ग क्षेत्रीय कार्यालयात १८१ जणांचे अर्ज आले असून त्यापैकी २६ जणांचे अर्ज बाद झाले. तर १५५ जणांना निवडणूक लढवता येईल. ह क्षेत्रीय कार्यालयात ३६७ उमेदवारांचे अर्ज आले असून सर्वाधिक ३५ जणांचे अर्ज बाद झाले आहेत त्यामुळे त्याठिकाणी ३३२ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज बाद होण्याची कारणे अनुमोदक दुसऱ्या प्रभागातील असणे. शपथपत्रात माहिती न भरणे, जात पडताळणी नसणे. अर्ज अपूर्ण असणे, शपथपत्र नसणे, अनामत रक्कम भऱलेली नसणे व पावती जोडलेली नसणे. नामनिर्देशन पत्रावर उमेदवाराची सही नसणे, मतदार यादीतील नावामध्ये तफावत, जात प्रमाणपत्र नाही. तसेच वय वर्ष २१ पूर्ण नसल्याने काही जणांचे अर्ज बाद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.