प्रभात वृत्तसेवा पिंपरी ( संदीप घिसे ) – पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या निवडणुका म्हणजे पुढाऱ्यांसाठी लोकशाहीची पहिली शाळा. या शाळेत पाऊल ठेवणाऱ्या नवोदित उमेदवारांसमोर उमेदवारीपासून ते मतपेटीपर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण आणि शिकवण देणारा असतो. राजकारणातून समाजकारण करण्याची उमेद बाळगणाऱ्या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी मिळवणे, प्रचार राबवणे आणि मतदारांना विश्वासात घेणे, या तिन्ही आघाड्यांवर कसोटी द्यावी लागणार आहे. आजच्या निवडणुका केवळ सेवाभावाची चाचणी राहिल्या नाहीत; तर पैसा, संघटन, प्रभाव आणि जनसंपर्काची थेट लढत ठरल्या आहेत. त्यामुळे नवोदितांसाठी ही निवडणूक म्हणजे केवळ राजकीय प्रवेश नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाची पहिली परीक्षा आहे. नवोदितांसाठी पहिले आव्हान म्हणजे पक्षाची उमेदवारी मिळवणे. पक्षांतर्गत गटबाजी, जुने पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मर्जी, हेच निर्णायक ठरत आहे. अनेक तरुण कार्यकर्ते आपल्या कामगिरीचा दाखला देत, स्थानिक नेत्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.कामगार, महिला आणि युवक यांच्या प्रश्नांवर चर्चा, समाजसेवेची पार्श्वभूमी आणि सातत्याने केलेला जनसंपर्क हेच नवोदितांच्या प्रचाराचे मुख्य शस्त्र ठरणार आहे. उमेदवारी जाहीर झाली की खरी शर्यत सुरू होते. प्रचारासाठी निधी, कार्यकर्त्यांची फौज, वेळ आणि रणनीती यांचा समतोल साधणे हे नवोदितांसाठी मोठे आव्हान ठरते. जुन्या नेत्यांकडे पैसा आणि संघटनशक्तीचा आधार असतो; तर नवोदितांकडे तरुणाईचा उत्साह आणि ‘बदल घडवू या’चा जाज्वल्य आत्मविश्वास असतो. घराघरांत भेटी देत, बैनर-फ्लेक्स लावत, सोशल मीडियावर मोहिमा राबवत नवोदित मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांपेक्षा वेगळी छबी निर्माण करण्यासाठी “काम आणि वचन” यांचा समतोल साधणे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे ठरत आहे. जनसंपर्क आणि प्रतिमेची परीक्षा महापालिकेच्या या निवडणुकीत जनसंपर्क हीच खरी चावी ठरणार आहे. नवोदित इच्छुक उमेदवारांना स्थानिक सामाजिक, जातीय आणि गटीय समीकरणांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक मतदारसंघातील प्रभावी घटकांना आपलेसे करावे लागणार आहे. आज मतदार ‘कोण आपला?’ यापेक्षा ‘कोण जिंकणार?’ याकडे पाहतात. त्यामुळे फक्त वचनांवर नव्हे, तर विश्वास आणि कामगिरीवर मतदारांचा कल ठरतो आहे. अनुभवातून धडा मिळतो प्रचारातील उत्साह मतदानाच्या दिवशी नेहमीच टिकतोच असे नाही. शेवटच्या क्षणी होणारी समीकरणे, गटबाजी आणि संघटनशक्तीचा परिणाम अंतिम निकालावर दिसून येतो. नवोदितांसाठी हा दिवस म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची खरी चाचणी. काहीजण पहिल्याच लढतीत विजयी होतात, तर काहींना पराभवाचा धडा मिळतो. पण दोघांनाही हा प्रवास राजकारणातील अमूल्य अनुभव आणि लोकसंपर्काची शिकवण देऊन जातो. नवोदितच बदलाचे वाहक अडचणींचा सामना करतही नवोदित उमेदवारच शहरी भागातील समाजात नवा दृष्टिकोन, नव्या पिढीचा विचार आणि परिवर्तनाची नवी दिशा देऊ शकतात. त्यांच्याकडे ऊर्जा आहे, इच्छाशक्ती आहे आणि काहीतरी वेगळं घडवण्याची तळमळ आहे. त्यामुळे त्यांचा प्रत्येक संघर्ष हा भविष्यातील नेतृत्वाची बीजे पेरणारा ठरतो. महापालिका निवडणुका ही केवळ सत्तेची नव्हे, तर जनसेवेच्या मनोधैर्याची परीक्षा आहे. उमेदवारीपासून मतपेटीपर्यंतचा प्रवास कितीही कठीण असला, तरी या प्रक्रियेतूनच खऱ्या लोकप्रतिनिधीचा जन्म होतो.