प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्दी केल्यानंतर त्याची विक्री सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसात विविध प्रभागातील इच्छुकांनी १९७ मतदार याद्या विकत घेतल्या आहेत. या यादी विक्रीतून निवडणूक विभागाला १५ लाख २९ हजार ३९० रुपये शुल्क देखील जमा झाले आहे.महापालिका निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार मतदार यादी खरेदीसाठी नागरिक आणि विविध पक्ष-घटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. यादी विकण्याचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या नोंदी पडताळता याव्यात, तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवावी हा आहे. महापालिका कार्यालयात यादी विक्रीसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली असून ग्राहकांना कागदी प्रत देण्यात येत आहे. इच्छुक नागरिकांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही मतदार याद्या मिळवता येणार आहेत. यादी प्रसिध्द केल्यानंतर पहिल्या दोन दिवसात विविध प्रभागातील एकूण १९७ मतदार याद्यांची विक्री झाली आहे. या यादी विक्रीतून निवडणूक विभागाला १५ लाख २९ हजार ३९० रुपये शुल्क देखील जमा झाले आहे. मतदार यादीसाठी प्रती पान २ रुपये शुल्क निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आकारले जात आहे. पहिल्या दिवशी १७ हरकती महापालिकेकडून प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.२१) एकूण १७ हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये नमुना अ हरकती फ क्षेत्रीय कार्यालयात ३ आणि ह क्षेत्रीय कार्यालयात १३, तसेच नमुना ब हरकतींमध्ये फक्त क क्षेत्रीय कार्यालयात १ हरकत निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली आहे. मतदार याद्यांमधील घोळामुळे येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.