प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सत्ता बदल करण्यासाठी महाविकास आघाडीने जोर-बैठका सुरू केल्या आहेत. बैठकांचे सत्र सुरू झाले असून इच्छुकांच्या मुलाखती आणि पॅनेल जुळवणी करण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत येईल तेव्हा येईल, तो निर्णय वरिष्ठ घेतील मात्र, स्थानिक पातळीवर तीनही पक्षांने तयारी सुरू केली आहे. सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकसंघ शिवसेनेने ९ जागा मिळवल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३६ जागी यश मिळवले होते. काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नव्हता. दरम्यानच्या काळात पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्यातील राजकीय घडामोडींने शहरातील राजकीय चित्र देखील बदलले. शिवसेनेतील उभी फूट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले दोन गट यामुळे महाविकास आघाडी दुबळी झाली आहे. शहरात देखील याचा परिणाम झाला असून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची पांगापांग झाली. असे असताना शहरातील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महापालिकेवरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर या सत्तेला आव्हान देत महापालिकेमध्ये सत्ताबदल करण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे शहराध्यक्ष आणि पदाधिकार्यांनी एकत्र येत गुरूवारी एक बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम उपस्थित होते. यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेत १३६ इच्छुक शहरातील ३२ प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिकिटावर लढण्यास १३६ जण इच्छुक आहेत. त्यापैकी १३० इच्छुकांच्या बुधवारी आणि गुरूवारी मुलाखती झाल्या. आकुर्डी येथील शिवसेना भवन येथे पक्षाचे संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील यांनी या मुलाखती घेतल्या. तर सहा इच्छुक बाहेर असल्याने त्यांच्या मुलाखती झाल्या नाहीत, मात्र त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेसाठी इच्छुक असलेले उमेदवार आणि पदाधिकार्यांची शनिवारी (दि. १४) पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर हे बैठक घेणार आहेत. “महापालिकेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू झाली आहे. तीनही पक्षांच्या शहराध्यक्षांची नुकतीच बैठक झाली. यामध्ये निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यात आली आहे. अजित पवार गट महाविकास आघाडीमध्ये येणार याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली नाही. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मात्र, आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून पॅनेल जुळवणीला सुरूवात केली आहे.” – संजोग वाघेरे, शहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.