प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विवाहित महिला उमेदवारांच्या मतदार यादीतील नाव नोंदणीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करत राज्य निवडणूक आयोग यांनी स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार, निवडणूक लढविणाऱ्या महिलेचे नाव पिंपरी-चिंचवड शहराच्या मतदार यादीत असणे बंधनकारक आहे. परिणामी, माहेर किंवा पूर्वीची मतदार नोंदणी अन्य जिल्ह्यात असलेल्या नवविवाहित महिलांची यंदाची निवडणूक लढविण्याची संधी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विवाहानंतर नावात बदल झाल्यास उमेदवारी अर्जावर कोणते नाव नमूद करावे, याबाबत संभ्रम होता. हा संभ्रम लक्षात घेऊन आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादीतील नावालाच प्राधान्य देण्यात येईल. यंदा अनेक पक्षांकडून युवा उमेदवारांना संधी देण्यावर भर असून, महिला आरक्षणामुळे काही प्रभागांत पुरुष इच्छुकांनी आपल्या सौभाग्यवतीला निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी केली होती. मात्र, संबंधित महिलेचे नाव शहरातील मतदार यादीत नसल्यास उमेदवारी ग्राह्य धरली जाणार नाही. नाव बदलासाठी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज आवश्यक विवाहित महिला उमेदवाराने मतदार यादी व नामनिर्देशन पत्रात नमूद असलेल्या नावाऐवजी मतपत्रिकेवर वेगळे (विवाहानंतरचे) नाव छापायचे असल्यास, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे स्वतंत्र विनंती अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. या अर्जासोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्रात प्रसिद्ध झालेले विवाहानंतरचे नाव यापैकी किमान एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. वरील प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास, आयोगाच्या ८ नोव्हेंबर २०११ च्या आदेशानुसार नमूद १७ ओळख पुराव्यांपैकी छायाचित्र असलेला कोणताही एक वैध पुरावा सादर करणे अनिवार्य राहील. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय उमेदवारी वैध ठरणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेषतः १ जुलै २०२५ नंतर विवाह झालेल्या महिलांसाठी मतदार नोंदणी, नाव बदल आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे वेळेअभावी कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा इच्छुक महिलांसाठी यंदाची निवडणूक प्रशासकीय अटींमुळे आव्हानात्मक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.