प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पक्षाची राजकीय परिस्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे. इतर पक्षांनी निवडणुकीसाठी जौरबैठका सुरू केल्या असताना शहरातील काँग्रेस पक्षाची राजकीय परिस्थिती चिंताजनक बनली आहे. शहरात एकेकाळी भक्कम संघटनात्मक रचना, उत्साही पदाधिकारी आणि सक्रीय कार्यकर्त्यांचा ‘हात’ आज दिसेनासा झाला आहे. पक्षामध्ये रणनीतीचा अभाव, नेतृत्वाची उदासीनता आणि स्थानिक पातळीवरील गटतट यामुळे काँग्रेसला शहरात अस्तित्व टिकवणेही कठीण होत आहे. शहरातील राजकीय समीकरणांचा विचार करता, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला अद्याप उर्जितावस्था आली नाही. निवडणुकीची चाहूल लागूनही पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साह नसल्याचे दिसून येत आहे. शहराध्यक्ष पातळीवरून विभागनिहाय कामाची आखणी, बूथ कमिटीची रचना, प्रचार धोरणाबाबतचे मार्गदर्शन या सर्व बाबतीत पक्ष पूर्णपणे निष्क्रिय दिसत आहे. परिणामी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्येही नाराजी वाढत आहे. राज्यात सत्ता असलेल्या महायुतीच्या पक्षांकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. इच्छुक उमेदवारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवणे हा पक्षासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. इच्छुकांना आकर्षित करण्यासाठी शहर पातळीवर काही हालचाली होताना दिसत नाहीत. काँग्रेस दिशाहीन अवस्थेत महापालिका निवडणुका जवळ आल्यावर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे, संघटनाला उर्जितावस्था देणे, युवा नेतृत्व तयार करणे अशा गोष्टींची गरज भासत आहे. मात्र काँग्रेसच्या स्थानिक तसेच वरिष्ठ पातळीवरील दुर्लक्षामुळे हे प्रयत्न होण्याची चिन्हेसुद्धा सध्या दिसत नाहीत. शहरातील अन्य प्रमुख पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असतानाच काँग्रेस मात्र दिशाहीन अवस्थेत दिसत आहे. भोपाळा फोडणार का? सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये शहरातील अनेक चांगले चेहरे होते. सन २०२२ पर्यंत शहरातील या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस जिवंत ठेवली होती. मात्र, त्यानंतर एक-एक करत या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसची साथ सोडली. सन २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळवता आले नव्हते. गेल्या काही वर्षांतील शहरात काँग्रेसची घटती पकड, उमेदवारांचा वाढता दुरावा आणि नेतृत्वाचा बेफिकिरीचा दृष्टिकोन यामुळे आगामी निवडणुकांत पक्षाची स्थिती आणखी डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक व्यक्ती एक पद यामुळे नाराजी काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने एक व्यक्ती एक पद ही नवीन भूमिका घेतली आहे. मात्र, शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्याकडे काँग्रेस पक्षाची एकाहून अधिक पदे आहेत. तर इतर कार्यकर्त्यांना कोणतेही पद मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. हीच नाराजी पक्षातील निष्ठावंताना बाहेरचा रस्ता दाखवत आहे.