प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी–चिंचवडमधील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचाराची धावपळ अंतिम टप्प्यात आली आहे. घरोघरी प्रचार करताना मतदारांच्या प्रश्नांनी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चांगलीच कसोटी लागायला सुरुवात झाली आहे. केवळ पत्रक देऊन भागत नसून मतदार तोंडी परीक्षा घेत प्रश्नांची सरबत्ती करत असल्याने अनेकांची भंबेरी उडताना दिसत आहे. सध्या थंडीचा मोसम असला तरी पिंपरी–चिंचवड शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक उमेदवारांनी घरभेटी, पत्रकवाटप आणि छोट्या सभा घेत आपल्यालाच मतदान करावे, असे आवाहन मतदारांना करीत आहेत. काही ठिकाणी उमेदवार स्वतः मतदारांच्या घरी जात आहेत, तर काही ठिकाणी महिला कार्यकर्त्या आणि समर्थकांकडे प्रचाराची धुरा सोपवली आहे. मात्र, मतदार फक्त पत्रके स्वीकारून शांत बसत नाहीत; उलट थेट प्रश्न विचारत उमेदवारांना उत्तरांसाठी गाठत आहेत.पाणीपुरवठा नियमित म्हणजे दररोज आणि पुरेशा दाबाने का नाही, कचरा उचलण्याची वेळ का पाळली जात नाही, आम्ही कामाला जात असल्याने कचरा गाडी येते तेव्हा आम्ही घरी नसतो. त्यामुळे कचरा कुंडी का ठेवत नाहीत, भटकी कुत्री व जनावरे कधी हटणार, फुटपाथ व उद्यानांवरील अनधिकृत टवाळखोरांवर कारवाई का होत नाही, रस्त्यांची डागडुजी कधी होणार, अशा रोजच्या जीवनाशी निगडित तक्रारी प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात मांडल्या जात आहेत.काही मतदार थेट राजकीय प्रश्नही विचारत आहेत. “कोणत्या गटासोबत आहात?”, “आजपर्यंत किती पक्ष बदलले?”, “पुढे पुन्हा बदलणार तर नाही ना?”, “प्रलंबित कामे किती वर्षे रेंगाळत आहेत?” अशा प्रश्नांनी उमेदवारांची कोंडी होताना दिसत आहे. तयारी करून आलेले उमेदवार या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, गृहपाठ न केलेले काही इच्छुक प्रश्नांना सामोरे जाताना गोंधळून जात असल्याचेही चित्र समोर येत आहे. चुकीचे उत्तर दिल्यास त्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता असल्याने अनेक जण सावध भूमिका घेत असल्याचे दिसते. आत्तापर्यंतच्या कामाचा हिशोब द्या काही उमेदवारांनी संभाव्य विकासकामांचा उल्लेख असलेली पत्रके आधीच वाटण्यात आणली आहेत. नव्या रस्त्यांची कामे, उद्यानांचे सुशोभीकरण, पाणी व ड्रेनेज सुविधा, कचरा व्यवस्थापन सुधारणा, वाहतूक कोंडीचा प्रश्न, अशा आश्वासनांची नोंद जाहिरनाम्यांत करण्यात आली आहे. मात्र मतदार केवळ वचनांवर समाधानी नसून “आतापर्यंत काय केले?” याचा हिशेबही मागू लागले आहेत. मतदारांनी घेतलेली ही “तोंडी परीक्षा” उमेदवारांसाठी कठीण प्रश्नपत्रिका ठरत आहे, अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.