प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २३) अर्ज वाटप आणि स्वीकृतीला सुरूवात झाली आहे. अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शहरातील ३२ प्रभागांतून तब्बल ८७५ उमेदवारांनी २ हजार २१२ इतके अर्ज नेले होते. तर शुक्रवारी (दि. २६) दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल १ हजार ९४२ उमेदवारांनी ४ हजार ७२५ अर्ज घेतले आहेत. महापालिका निवडणुकीची ऱणधुमाळी सुरू झाली आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र नेण्यास सुरूवात झाली आहे. त्याची मुदत ३० डिसेंबर असून त्यादिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवार नामनिर्देशनपत्र घेऊन जाऊ शकतात. यंदा तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अद्याप शहरातील प्रमुख पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज नेण्यासाठी निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी केली आहे. त्यामध्ये मंगळवारी (दि. २३) ८८३ उमेदवारांनी २२१६, बुधवारी ६१५ उमेदवारांनी १४३३ अर्ज व शुक्रवारी ४४४ उमेदवारांनी १०७६ अर्ज घेतले आहेत. आतापर्यंत १९४२ उमेदवारांनी ४७२५ अर्ज घेतले आहेत. जसजसे उमेदवार जाहीर होतील तशी ही संख्या आणखी वाढणार आहे. १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज शुक्रवारी (दि. २६) एकाच दिवशी १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आतारपर्यंत अर्ज दाखल केलेल्यांची संख्या १३ इतकी झाली आहे. आज दाखल केलेल्या अर्जांमध्ये भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मधून दिलीप मुरलीधर गोसावी, काँग्रेसचे राजेंद्र गुलाबराव साळुंके आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राहुल राजेंद्र पालांडे यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपचे उदय गायकवाड, प्रभाग ३ मधून ज्ञानेश्वर बोराटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग २१ मधूव अब्दुल शेक अपक्ष आणि प्रभाग २४ मधून शिवसेनेच्या विश्वजीत बारणे यांनी अर्द दाखल केला आहे.