प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आम आदमी पार्टी (आप) च्या वतीने प्रभाग क्रमांक २६ मध्ये शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक घर टू घर जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विशालनगर, कस्पटेवस्ती परिसरात राहणाऱ्या तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन थेट संवाद साधण्यात आला. तसेच यावेळी आपच्या गॅरंटी कार्डचे वितरण करण्यात आले. या जनसंपर्क मोहिमेदरम्यान आम आदमी पार्टी कडून नागरिकांना टँकरमुक्त सोसायटी, वाहतूककोंडीमुक्त पिंपरी-चिंचवड आणि मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्याच्या ठोस हमी देण्यात आल्या. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, दैनंदिन सोयी-सुविधा तसेच प्रशासनातील पारदर्शकता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर नागरिकांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. रविराज काळे यांनी यापूर्वीही प्रभागातील नागरी प्रश्नांवर सातत्याने काम करत प्रत्यक्ष कृतीतून दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, याच विश्वासाच्या जोरावर या अभियांनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक २६ च्या विकासासाठी आणि समस्या मुळापासून सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.