PCMC : पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे व आस्थापनांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाची आढावा बैठक नुकतीच आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचीही माहिती आयुक्तांनी घेतली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरात पाणी साचू नये आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करावी. स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना, प्लास्टिक वापरावर कडक कारवाई आणि तीव्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीमध्ये महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरातील एकूण १४५ नाले आणि सुमारे ९४,९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली. १६ मार्च रोजी केवळ ४.९९ टक्के असलेली प्रगती २३ मार्चपर्यंत १३.८३ टक्के झाली असून ३० मार्चपर्यंत ती २२.६७ टक्के पर्यंत पोहोचली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रगती पाहता ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने ३२.२२ टक्के प्रगती साधत आघाडी घेतली आहे. ‘अ’ (२८.२८%) आणि ‘ई’ (२५.६३%) क्षेत्रीय कार्यालयांनीही चांगली कामगिरी केली असून ‘ब’ (२४.६७%) आणि ‘ग’ (२४.३३%) क्षेत्रीय कार्यालयांनीही स्पर्धात्मक वेग दाखवला आहे. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये झिरो वेस्ट स्लम, आर.आर.आर. सेंटर, कचरा व्यवस्थापन, जनजागृती मोहीम, कचरा विलगीकरण, प्लास्टिक बंदी तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नव्या उपक्रमांचा समावेश आहे. मोठा चमत्कारच..! गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळे घशाचा आजार बरा झाला, मुंबई महापौर रितू तावडेंचं वक्तव्य चर्चेत