PCMC BJP Slogan – काँग्रेस व इंडिया आघाडीने महिलांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि. २०) भाजपकडून निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर भाजपसह महायुतीतील घटकपक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन केले. या आंदोलनात घोषणा देताना गोंधळलेल्या भाजप नगरसेवकांनी अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… अशा आपल्याच सरकारविरोधातच घोषणाबाजी करण्याची घोडचूक केली. त्यात सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे सगळ्यात पुढे होते. केंद्र सरकारकडून नारी शक्ती वंदन २०२३ मध्ये सुधारणा अधिनियम, सीमांकन आयोगाची स्थापना करण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांमध्ये महिला आरक्षण लागू करण्यासाठी विधेयक संसदेत मांडण्यात आले. परंतु, विधयेकासाठी दोन तृतीयांश मते न पडल्यामुळे ते मागे घेण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढावली. त्यावरून देशभरात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील उमटले. महापालिका सभेत निषेध करून भाजपकडून सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर महापालिकेतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाकडून प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या आमदार उमा खापरे, महापौर रवि लांडगे, सत्तारुढ पक्षऩेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी सहभागी झाले होते. मात्र, प्रशांत शितोळेंसह नगरसेवकांनी यावेळी सरकारविरोधातच घोषणाबाजी केली. अरे या या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा दिल्या. चूक लक्षात येताच विरोधकांचा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, चुकीच्या घोषणा दिल्यावरून टिकेला सामोरे जाण्याची नामुष्की भाजप सत्ताधाऱ्यांवर ओढावली आहे.