PBKS VS KKR : युजीच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताच्या फलंदाजांनी टाकली नांगी

नवी दिल्ली : आज आयपीएल २०२५ मधील ३१ वा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाबने बाजी मारत कोलकाताचा पराभव केला. या सामन्यात पंजाबने १६ धावांनी कोलकाता वर विजय मिळवला. या विजयासह पंजाब ६ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचली तर कोलकाता ७ पैकी ३ सामने जिंकून ६ व्या स्थानी आहे.
संपूर्ण सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण पंजाबची सूरूवात काही चांगली झाली नव्हती. पंजाबच्या प्रभासिमरनला वगळता कोणत्याही खेळाडूला 30 चा आकडा गाठता आला नाही. कारण कोलकत्ताच्या गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुढघे टेकले होते.आणि 15.3 ओव्हरमध्ये पंजाबचा डाव संपूष्ठात आला होता. त्यामुळे कोलकत्ता समोर पंजाबने 112 धावांचे आव्हान ठेवले.
पंजाबने दिलेल्या ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाची सुरूवात फारच खराब झाली. पहिल्याच षटकात सुनील नरेन यान्सनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर पुढच्याच षटकात बार्टलेटच्या गोलंदाजीवर क्विंटन डि कॉक झेलबाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी चांगली भागीदारी रचली. पण युझवेंद्र चहलने अजिंक्य रहाणेला पायचीत करत ही भागीदारी तोडली. यानंतर मॅक्सवेल आणि चहलने झटपट फलंदाजांना बाद करत पंजाबला सामन्यात कायम ठेवलं आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली.
श्रेयसने नोंदवला ऐतिहासिक विजय
पंजाब किंग्सने केकेआरचा १६ धावांनी पराभव करत आयपीएलमधील ऐतिहासिक विदयाची नोंद केली आहे. श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्स संघाने आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.





